
जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या बीएसएफ जवानांवर हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी डाव साधला. या घटनेनंतर परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जवान नियमित गस्त घालत असताना हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेऊन अचानक हल्ला केला, ज्यामुळे जवानांना प्रतिकार करायला वेळच मिळाला नाही. हल्ल्यानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, मात्र सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी जवानांना सुरुवातीला स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी एम्समध्ये पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, दोन्ही जवानांची प्रकृती गंभीर आहे.
या हल्ल्यानंतर पोलीस, लष्कर आणि बीएसएफच्या संयुक्त दलांनी सुपवाल आणि आसपासचा परिसर सील केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉग्सचा वापर केला जात आहे. हा दहशतवादी हल्ला होता की स्थानिक समाजकंटकांचे कृत्य, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. सध्या, सांबा आणि सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.























































