
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका तसेच बल्लारपूर नगरपालिका क्षेत्रात 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर म्हणजेच येत्या गुरुवार ते रविवारपर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक पार पडली. या काळात सर्व रुग्णालय, औषधालय, कृषी केंद्र, बँका, शासकीय कार्यालय, तसेच एमआयडीसीमधील सर्व आस्थापना सुरु राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण, भाजीची दुकाने, किराणा दुकानेही सुरू राहतील. सर्व पानठेले, चहा टपऱ्या, फुटपाथवरील दुकाने बंद ठेवण्यात येतील. नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी केले.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तपासण्या वाढविण्यात आल्यामुळे बाधित पुढे येत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील उपलब्ध बेड संख्या तसेच ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यावर प्रशासनामार्फत भर देण्यात येत आहे.























































