
सामना ऑनलाईन । टोकीयो
जपानमध्ये उष्णतेची लाट असून तापमान ४० अंशावर पोहचले आहे. उष्माघातामुळे आठवड्याभरात ६५ जणांचा बळी गेला आहे. तसेच आठवड्याभरात २२ हजार ६४७ जणांना उष्णतेच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टोकीयोमध्ये तापमान ४० अंशावर पोहचले आहे. तर साईतामामध्ये सर्वाधिक ४१.१ तापमानाची नोंद करण्यात आली. जपानमध्ये उष्णतेच्या लाटेला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आले आहे.
गेल्या १० वर्षातील तापमानाचा हा उच्चांक आहे. २००८ नंतर उष्माघातामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत उष्माघाताने ८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३५ हजारपेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उष्णतेच्या प्रकोपापासून बचावासाठी सरकारच्या उपाययोजना सुरू आहेत. महत्त्वाच्या रस्त्यांच्याकडेला बर्फाच्या लाद्या ठेवण्यात येत आहेत. तसेच सर्व शाळांमध्ये एअरकंडीशनर बसवण्यात येणार आहेत. पुढील वर्षात ते काम पूर्ण होणार आहे. शाळांमध्ये एअर कंडीशनर बसवण्यासाठी सरकार निधी देणार आहे. जपानमधील अनेक सरकारी शाळांमध्ये एअरकंडीशनर नाहीत. त्यामुळे तापमानात आणखी वाढ झाल्यास शाळांना सुटी देण्यात येणार आहे.
जपानमध्ये अनेक भागात विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत जपानमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वतर्वला आहे.
























































