औद्योगित क्रांतीमुळे शहरामध्ये रोजगार निर्माण झाला आणि गावाकडील बेरोजगार तरुण-तरुणींचे लोंढेच्या लोंढे शहरात येऊ लागले. यामुळे शहरी भागाचा विकास तर झालाच, शिवाय येथील लोकसंख्याही वाढली. मात्र गावाकडे गल्लीबोळात साठीकडे झुकलेली आणि मध्यमवयीन लोकं उरली. गावाकडे राहून नोकरी, उद्योग-व्यवसाय करणाऱ्या तरुणांनाही याचा फटका बसला. लग्नाळू तरुणांना मुली भेटणे मुश्कील झाले. त्यामुळे गावाकडे सिंगल तरुणांची संख्या वाढली. आता ही समस्या सोडवण्यासाठी जपान सरकारने नामी शक्कल लढवली असून शहर सोडून गावी जाऊन लग्न करणाऱ्या तरुणींना जपान सरकारने पैसे देण्याची घोषणा केली आहे.
जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गावात महिलांची संख्या वाढावी यासाठी जपान सरकारने सिंगल तरुणींना पैसे देण्याची घोषणा केली आहे. जपानमध्ये ग्रामिण भागात महिलांची संख्या कमी आहे. 2020 च्या जणगणनेनुसार ग्रामिण भागात 91 लाख महिला, तर 1.1 कोटी पुरुष आहेत. याचाच अर्थ येथे महिलांची संख्या 20 टक्क्यांनी कमी आहे. काही भागात तर हे अंतर 30 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे सरकारने शहर सोडून गावी जाणाऱ्या सिंगल तरुणींना 7 हजार डॉलरपर्यंत (जवळपास 5 लाख 86 हजार रुपये) रक्कम देण्याची घोषणा केली आहे.
उच्च शिक्षण घेण्यासाठी तरुणी शहराकडे धाव घेतात आणि तिथेच सेटल होतात. त्यामुळे गावाकडे महिलांची संख्या घटत असून अविवाहित तरुणांची संख्याही वाढत आहे. यामुळे सरकारने तरुणींना प्रोत्साहित करण्यासाठी पैसे देण्याची घोषणा केली.
जपानच्या ग्रामिण भागामधील गेल्या वर्षी 7 लाख 27 हजार 277 बालकांनी जन्म घेतला. येथील जन्मदर हा 1.20 टक्के होता. मात्र या भागात संतुलन राखण्यासाठी हा जन्मदर 2.10 टक्के असणे गरजेचे आहे, असे जपान सरकारच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जपानआधी स्वीडननेही अशाच प्रकारची घोषणा केली होती. स्वीडन सरकारने आपल्या नागरिकांना देश सोडण्यासाठी पैसे देण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे सरकार येण्याजाण्याचा खर्च उचलण्यासही तयार आहे. येथील शरणार्थी आणि प्रवाशांना देश सोडण्यासाठी जवळपास 80 हजार रुपये मिळतात.