जपान ओपनमध्ये हिंदुस्थानचा गेम ओव्हर, लक्ष्य सेनसह हिंदुस्थानच्या सर्व खेळाडूंना पराभवाचा धक्का

बुधवारी पी. व्ही. सिंधूला सलामीलाच हार झेलावी लागली होती तर आज स्पर्धेच्या तिसऱया दिवशी हिंदुस्थानच्या लक्ष्य सेनसह सर्वच खेळाडूंना पराभवाचे धक्के बसले आणि जपान ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंचा गेम ओव्हर झाला.

जपान ओपनमध्ये हिंदुस्थानच्या एकाही बॅडमिंटनपटूला आपला जोरदार आणि सुसाट खेळ दाखवता आला नाही. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनला जपानच्या कोडई नराओकाविरुद्ध 19-21, 11-21 असा सहज पराभव पत्करावा लागला. लक्ष्यने पहिल्या गेममध्ये नराओकाला झुंजवले, मात्र दुसऱया गेममध्ये नराओकाला रोखण्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला.

महिलांच्या एकेरीत अनुपमा उपाध्यायला चीनच्या झियी वांगकडून 21-13, 11-21, 12-21 अशी हार सहन करावी लागली. महिला एकेरीत अनुपमाचेच आव्हान कायम होते, मात्र पहिला गेम जिंकल्यानंतरही तिला वांगकडून धक्का बसला.

रांकीरेड्डीशेट्टीकडून अपेक्षाभंग

हिंदुस्थानचे पुरुष दुहेरीतील आशास्थान असलेल्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीला उपउपांत्यपूर्वच्या लढतीत चिनी वांग आणि लियांग जोडीकडून 22-24, 14-21 असा धक्का बसला. पहिला गेममध्ये जोरदार संघर्ष करूनही हिंदुस्थानी जोडीला हार सहन करावी लागली. दुसऱया गेममध्ये चिनी जोडीने रांकीरेड्डी आणि शेट्टीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.