टोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले! कोरोनामुळे जपानमध्ये आणीबाणी

जपानमध्ये कोरोनाची आणखी एक लाट आलेली आहे. काही शहरांमध्ये 31 मेपर्यंत आणीबाणीही लागू करण्यात आलेली आहे. यामुळे 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱया टोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले आहे.

देशातील 3 लाख 50 हजारांच्यावर जनतेच्या सहय़ा घेऊन टोकियो ऑलिम्पिक आयोजनाच्या विरोधात याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार की काही दिवस पुढे ढकलण्यात येईल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

चार शहरांमध्ये कडक निर्बंध

जपानमधील टोकियो शहरात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार आहे, पण वाढत्या कोरोनामुळे टोकियोसह जपानमधील चार शहरांमध्ये मे महिन्याच्या अखेरीसपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. नॉर्थन होकेईदो या शहरातही आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. याच शहरामध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाचा फटका या संपूर्ण क्रीडा महोत्सवाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मेडिकल सुविधांचा अभाव

वाढत्या कोरोनामुळे जपानवर संकट कोसळले आहे. येथे कोरोनाची चौथी लाट येऊ नये यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे येथील जनतेने टोकियो ऑलिम्पिक आयोजनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती, जपानमधील आयोजक व सरकार यांनाही पाठवण्यात आलेली आहे. मेडिकल सुविधांचा अभाव असताना ऑलिम्पिकसारख्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे.

संघटकांकडून थम्स अप

टोकियो ऑलिम्पिक आयोजनाला मात्र विविध खेळांच्या संघटकांकडून थम्स अप दाखवण्यात आलेला आहे. कोरोनाला मागे टाकत आता पुढे जाणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व नियम पाळून टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या