चला फिरायला जपानला!

608

नमिता वारणकर,[email protected]

दादरला राहणारे राजेश वैद्य… एक नोकरदार मराठी मध्यमवर्गीय गृहस्थ… जपान या देशात राहून आल्यानंतर परदेश प्रवास म्हणजे काय हे लोकांना समजावं म्हणून त्यांनी केवळ जपानलाच नेणारी सहल संस्था स्थापन केली आहे…

जपानमधील एका मोठय़ा कंपनीत अभियांत्रिकी पदावर काम करणारे राजेश वैद्य… कामानिमित्त अनेक देश फिरल्यावर जपानची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना… यामुळेच त्यांनी त्यांच्या मनात भरलेला जपान नव्या दृष्टीने लोकांना दाखवण्याचा ध्यास घेतला… या ध्यासातूनच ‘हिकारी’ या केवळ जपानलाच नेणाऱया एकमेव टूर कंपनीची स्थापना केली. टुर्स पुष्कळ येतात, पण सहलीतलं समाधान मिळवण्यासाठी धडपड करावी लागते, ही गोष्ट हेरून त्यांच्या सोबत जपानला घेऊन जाणाऱया प्रत्येक व्यक्तीला वेगळं ‘समाधान’ देण्याचा त्यांनी पणच केला… आपल्या नेहमीच्या कामातून समाजाला वेगळं काहीतरी देण्याचा, शिकवण्याचा एका मराठी माणसाचा हा अनोखा प्रयत्न.

एकदा नुकतीच युरोपची सहल करून आलेल्या त्यांच्या मामांशी बोलत असताना त्यांच्या लक्षात आले की, त्यांना त्या टूरविषयी काहीच माहीत नाही. फक्त ते फिरून आले आणि त्यांनी तिथे फोटो काढले इतकच. कुठे काय बघितलं हे त्यांना काहीच सांगता येत नव्हतं. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, बऱयाच कंपन्यांच्या टूर्स खर्चिक असतात. पण त्यातून लोकांना जगण्यासाठी, शिकण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळं आश्वासक काहीतरी मिळालं पाहिजे. त्यामुळे त्यांना ‘इकोनॉमिकल टूर विथ जपान कल्चर’ ही संकल्पना सुचली. या कल्पनेवर आधारित ते एकटेच संपूर्ण सहलीचं नियोजन करून हिंदुस्थानातील लोकांना जपान सफरीला घेऊन जातात.

प्रत्यक्षात राजेश वैद्य आयटी आयटी इंजिनीयर… त्यांचा आणि टूरचा काहीही संबंध नाही. तरीही परदेश सहलीचं नियोजन करणं, जपानी लोकांबरोबर राहण्याची सोय करणं, तिथलं अन्न खाऊ घालण्याचं नियोजन करणं ही सर्व कामे ते स्वतःच पाहतात. जपानमध्ये जाऊन फक्त फोटो काढण्यात काहीच अर्थ नाही. जपानी माणूस जर आपल्या लोकांना कळला ना तर तिथे फिरल्याचा आनंद मिळेल. म्हणून माझ्यासोबत घेऊन जाणाऱया लोकांना मी जपानी लोकांसारखंच जीवन जगायला लावतो. त्यांच्यासारखं प्रवासासाठी बस किंवा ट्रेनचा वापर करायचा. त्यामुळे जपानी संस्कृती, शिस्त लोकांना माहिती होते. हे सगळ्यांना खूप आवडतं, असं ते सांगतात.

गेल्या दीड वर्षापासून टोकियो, योकोहामा, मुक्को, माउंट सुझी ही जपानमधील फिरण्याची ठिकाणं. टोकियो ही जपानची राजधानी. येथील शाही महाल हे जपानच्या राजाचे निवास स्थळ, टोकियो टॉवर जेथे हस्तकला दालन, मेणाचे संग्रहालय आहे. मिजी जिंगू श्राईन हे उत्तम हस्तकलेचा नमुना असलेले मंदिर ही ठिकाणी पाहता येतात. जपानचा समुद्र, होन्शू, क्युशू, शिकोकू आणि होक्कायडू ही बेटे पाहण्याजोगी आहेत. या शहरातील ओसाका शहराची गोष्ट काही औरच. येथील लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती नसते. तसेच योकोहामामधील निसान मैदान हे येथील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम येथे आहे. जपानी बाहुल्या, खेळणी, भातुकलीची खेळणी, जपानी गोष्टींची इंग्रजी पुस्तके, जपानी पझल्स या वस्तू तिथे प्रसिद्ध आहेत. फॅशन जगतात लागणाऱया वस्तू, विविध प्रकारच्या यांत्रिक वस्तू कॅमेरे, लेन्सेस इत्यादी तिकडे माफक दरात विकत मिळतात. शिवाय दुकानात जाऊन आधी वस्तू बघायची आणि नंतर साइटवरून तिची सर्वात कमी किंमत असेल त्या दुकानातून ती ऑनलाइन विकत घेता येतात. येथील ‘अमेयोको’ हे पादत्राणांपासून कपडय़ांपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू मिळण्याचं ठिकाण आहे. जपानच्या कलावंत कामगारांना जवळून बघण्याची संधी पर्यटकांना येथे मिळते, अशी माहिती देतात.

japan-21

सहलीचं वेगळेपण…

प्रवाशांना फक्त जपानमधील नव्या जागा दाखवणे उपयोगाचे नाही तर आपली लोकं जपानी लोकांसारखे जीवन जगू लागली तर बऱयाच चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकतील. या विचारामुळे तिथल्या प्रवासासंबंधीचं वेळापत्रक, भूकंपापासून रक्षण करण्यासाठी केलेली उपाययोजना, महापालिकेचं कामकाज, वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, यांची ओळख ते आपल्या जपान सफरीत प्रवाशांना करून देतात. जपानी जगताची सफर घडवण्याबरोबरच त्यांच्याकडून जे शिकायचे आहे, याची जाणीवही या प्रवासात ते करून देतात.

जपानी खाद्यसंस्कृती

तिथल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता यावा यासाठी सहलीच्या दिवसांत तिथल्याच जेवणाचा त्यांचा आग्रह असतो. जपानी खाद्यसंस्कृतीवर चिनी खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची नावंही न्यारीच… सेया सॉस, तोफू, चॉपस्टिक्स हे ठरलेले पदार्थ असले तरी, ‘सुशी’ हा जपानी पदार्थ जगभर प्रसिद्ध आहे. यामध्ये ‘नारे सुशी’ आणि ‘हाया सुशी’ असे दोन प्रकार आहेत. मासे टिकवण्यासाठी किंवा आंबवण्यासाठी भातात राईस व्हिनेगर घालून माशांसोबत हा पदार्थ खाल्ला जातो. तसेच ‘निगिरी झुशी’ हा पदार्थ अंडाकृती भाताच्या गोळ्यावर ताज्या माशाचा पातळ तुकडा ठेवून खातात. फास्ट फूड म्हणून तिथे हा प्रसिद्ध असून जाता-येता पटकन खाता येतो. ‘रामेन’ अर्थात ‘सूप नूडल्स’ हे जपानी लोकांचं अतिशय प्रिय फास्ट फूड. ही रेसिपी जपानमध्ये प्रांताप्रांतानुसार बदलत जाते. ‘हारा हाची बू’ ही आरोग्यपूर्ण खाद्यप्रकारांनी सजलेली रेसिपी. याशिवाय तेरियाकी सामन, होरेन्सो नो गोमाए, कोरोक्के ही काही इतर पदार्थांची नावे. असे असले तरीही जपानी लोकांचा आहार फारच कमी असतो. भात आणि मासे हे तिथे मुख्य अन्न मानलं जात असलं तरीही ‘वागाशी’ ही तिथली पारंपरिक मिठाई. इथल्या मिठायांचे वैशिष्टय़ म्हणजे मिठायांचा आस्वाद ग्रीन टीसोबत घेतला जातो. ‘नामागाशी’, ‘मोची’ ही अन्य काही मिठाईंची नावे. जॅपनिज लोकांचे वैशिष्टय़ म्हणजे अन्नाप्रति कृतज्ञता व्यक्त करूनच ते अन्नग्रहण करतात.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या