कोल्हापूर – अमेरिकेचा तरुण उसाच्या शेतात झोपलेला पाहून गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला

2895

भुदरगड तालुक्यातील करंबळी येथे एक तरुण जंगलात पळून गेला होता. या तरुणाला मराठीचा गंध नव्हता आणि तो हिंदीही मोडकं-तोडकं बोलत होता. या तरुणाची गाडी चिखलात अडकली होती जी ग्रामस्थांनी बाहेर काढली होती. गाडी बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी या तरुणाची विचारपूस करायला सुरुवात केली, ज्यानंतर तो जंगलात पळून गेला होता. यामुळे या भागात भीतीचं वातावरण पसरलं होतं. बोलण्या-चालण्यावरून विदेशी वाटणारी ही व्यक्ती अशा पद्धतीने जंगलात पळून गेल्याने अफवांचे पीक फुटले होते. ही माहिती पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली.

मूळचा पंजाबचा पण सध्या कॅलिफोर्निया(अमेरिकेत)वास्तव्यास असणारा जपनाम राजेंद्र सिंह हा तरुण इंटरनेटवरील मॅपच्या मदतीने मुंबईवरून गोव्याला जात होता. मार्ग भरकटल्याने जपनाम हा भुदरगड तालुक्यातील करंबळी इथे पोहोचला होता. तिथल्या वेदगंगा नदीच्या तुटलेल्या पुलाजवळ त्याची गाडी चिखलात अडकली होती. ग्रामस्थांनी त्याला मदत केली आणि कुठून आलास, कुठे जायचंय अशी विचारणा केली. त्यांच्याशी नीट संवाद साधता येत नसल्याने आणि गर्दी वाढत चालल्याने तो घाबरला होता. घाबरलेल्या जपनामने जंगलात धूम ठोकली होती. पोलीस निरीक्षक संजय पतंगे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या जपनामच्या शोधासाठी मोहीम सुरू केली होती.

पतंगे यांनी पोलीस व्हॅनच्या स्पीकरवरून जपनाम याला आपला आवाज येत असल्यास ते सांगत असलेल्या मोबाईलवर संपर्क साध, लाईव्ह लोकेशन शेअर कर असा संदेश देत होते. पोलीसगाडीच्या सायरनचा आवाज करत, आवाजाच्या दिशेने ये असे आवाहनही करत होते. जपनाम जंगलात हरवल्याने त्याला नेमकी दिशा कळत नव्हती. मात्र तो पतंगे यांच्या सूचनांचे पालन करत होता, त्याने मोबाईलवर लाईव्ह लोकेशनही शेअर केले. पतंगे आणि त्यांचे सहकारी 14 तास जपनामचा शोध घेत होते. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि जपनामच्या मोबाईलची संपत आलेली बॅटरी अशा आव्हानांचा मुकाबला करत पतंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जपनामला शोधून काढले. बुधवारी सकाळी दहा वाजता नांदोली गावाच्या हद्दीतील बोनुटी नावाच्या ऊस शेतात तो झोपलेला सापडला. जपनामला पोलिसांनी गोव्याचा मार्ग नीट समजावून सांगत त्याला रवाना केले. पोलिसांनी केलेल्या मदतीसाठी जपनामने त्यांने अनेकदा आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या