
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त सहकार्याने परळी मतदारसंघातील बचतगटांच्या महिलांना 800 गायींचे वाटप रविवारी नटराज रंगमंदिरात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बालासाहेब दोडतले, जि.प. अध्यक्ष सविता गोल्हार, परभणी पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. शैलेश मदने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महिला आर्थिक विकास मंडळाच्या सदस्या उमाताई समशेट्टे, रत्नमाला घुगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, महिलांना आम्ही घरपोच गाय दिली आहे, यासाठी कुणाला एक रूपयाही द्यावा लागला नाही. सर्वांना मोफत गायी वाटप केल्या. यातून माझ्या भगिनी दूधाचा व्यवसाय करून कुटूंबाचा आर्थिक कणा बनतील. मी ज्यावेळी पहिल्यांदा मंत्री झाले त्यावेळी 56 हजार बचतगट होते. आता याची संख्या 4 लाखांवर गेली आहे. एकीकडे दुष्काळात शेतकरी आत्महत्या होत असताना दुसरीकडे मात्र बचतगटांच्या महिलांनी आपल्या व्यवसायातून घराला सावरले, त्यांची ही ताकद मला मोठी वाटते.ज्या समाजात नीर (पाणी) आणि नारी (स्त्री) सुरक्षित आहे तो समाज सुरक्षित असल्याचेही त्या म्हणाल्या. ‘घरात आई, गोठ्यात गाई आणि मनात आमच्या मात्र पंकजाताई’ अशा शब्दांत उपस्थित महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दुभत्या जनावरांच्या पायलट प्रोजेक्टसाठी बीडची निवड – महादेव जानकर
महादेव जानकर यांनी पशूसंवर्धन विभागाने दूभत्या जनावरे वाटपासाठी पायलट प्रोजेक्ट आखला असून त्यासाठी बीड जिल्हयाची निवड केली असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे यांच्या सूचनांमुळेच या गायी आम्ही महिला बचतगटांना दिल्या आहेत. गायीबरोबरच आता शेळ्या-मेंढ्या देण्याचाही विचार आहे. राज्यात बचतगटांचे काम वाढले, असे काम करणारा मंत्री मी कधीच पाहिला नाही, त्यामुळे त्यांचे नेतृत्व सक्षम करा असे ते म्हणाले.

























































