
किरकोळ कारणावरून सहाजणांनी एका ढाब्याला आग लावल्याची घटना जत तालुक्यातील मुचंडी येथे घडली आहे. या घटनेत ढाबा पूर्णपणे जळून खाक झाला असून, जत पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मांतेश नारायण मलमे, नारायण मलमे, दर्याप्पा मलमे, प्रकाश मलमे, प्रकाशकुमार मलगोंडा पाटील, श्रीनिवास मलगोंडा पाटील (सर्व रा. मुचंडी, ता. जत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीधर विठ्ठल कोळी यांनी फिर्याद दिली आहे.
मुचंडी येथे श्रीधर कोळी यांचा नवीन ढाबा आहे. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान श्रीधर कोळी यांना किरकोळ कारणावरून मांतेश मलमे व त्याच्या साथीदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोळी यांचा भाऊ महेश व वडिलांना शिवीगाळ केली. दरम्यान, शनिवारी रात्री मांतेश मलमे व त्याच्या साथीदारांनी कोळी यांच्या ढाब्याला आग लावली. या आगीत ढाबा जळून खाक झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेश मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.























































