जावेद जकारिया करतायत हिंदूंवर अंत्यसंस्कार, वर्षभरात तब्बल 1650 मृतदेहांना दिला भडाग्नी

कोरोना प्रकोपामुळे सध्या देशातच नव्हे तर राज्यातही भीती पसरली आहे, अशा परिस्थितीत राज्य प्रशासन, आरोग्य विभाग, डॉक्टर, परिचारिका, पोलीस बांधव व असंख्य कोविड योद्धे या लढाईत जीव लावून कोविडला हरवूच या आत्मविश्वासाने न थकता वर्षभरापासून लढत आहेत. परंतु या कोविडच्या लढाईत खूप योद्धे असे आहेत की, जे माणुसकी या नात्याने या लढाईत जातपात, धर्म विसरून उतरलेले आहेत. त्यातीलच एक आहेत अकोल्यातील जावेद जकारिया.

त्यांनी आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व नंतर अंतिम संस्कारासाठी नातेवाईकांनीही पाठ फिरवलेल्या मृतदेहांना त्यांच्या धार्मिक पद्धतीने अंतिम संस्कार करून या कोरोना काळातही माणुसकीचे दर्शन घडवले. 11 एप्रिल 2020 पासून ते कालपर्यंत एक वर्षभरात त्यांनी 1650 मृतदेहांवर मृतकाच्या धार्मिक विधीनुसार अंतिम संस्कार करून या जगात जात, धर्म, पंथ यापेक्षाही मानवता व सेवाभाव हाच महत्त्वाचा असल्याचा संदेशच जावेद जकारिया व त्यांच्या मेमन ट्रस्टच्या सहकाऱयांनी सर्वांना दिला. त्यांच्या या सत्कर्माचे सर्वत्रच कौतुक होत आहे.

जावेद जकारिया यांच्या मार्गदर्शनाखाली मेमन ट्रस्टचे सहकारी सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. एक वर्षापूर्वी कोरोनाने थैमान घातल्यानंतर त्याची दहशत इतकी पसरली की, मृत्यू पावलेल्यांचे नातेवाईकही अंतिम दर्शनासाठी पुढे येत नव्हते. त्यावेळी जावेद जकारिया व त्यांच्या सहकाऱयांनी मृत्यूनंतर प्रत्येकालाच त्याच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार त्याच्या नातेवाईकांना पार पाडण्याचा अधिकार आहे, परंतु या कोरोनाच्या महामारीत भीतीने अनेक नातेवाईक मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची जबाबदारी झटकून मृतकाला तसेच सोडून निघून गेले. अशा वेळी जकारिया यांनी 11 एप्रिल 2020 ला पहिल्या मृतकावर त्याच्या धार्मिक विधीनुसार अंतिम संस्कार केला. त्यांच्या या उदात्त हेतूचा प्रवास वर्षभर सुरूच होता.

अकोला, अमरावती आणि मराठवाडय़ातील मृतांवर केले अंत्यसंस्कार

अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम व मराठवाडय़ातील अशा एकूण 1650 कोविडने मृत्यू पावलेल्या मृतदेहांवर त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंतिम संस्कार करून त्यांना मृत्यूनंतरही धार्मिक विधीनुसार अंतिम संस्काराचा अधिकार प्राप्त करून दिला.

इतर समाजातील मृतांचाही समावेश

यामध्ये 90 टक्के हिंदू व इतर समाज आहे हे विशेष. यामध्ये सर्व जातीधर्मीयांचा समावेश होता, पण जावेद जकारिया यांनी माणुसकी जपत अंतिम संस्कार केले. अकोल्यातील सर्वच मुख्य स्मशानभूमीत त्यांनी हे अंतिम संस्कार केले. त्यांच्या या कार्याला प्रत्येकजण सलाम ठोकून त्यांचे व त्यांच्या सहकाऱयांचे कौतुक करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या