जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 78 टक्के; नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणीसाठा 78 टक्के एवढा झाला असून कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पैठण शहर व गोदाकाठी वसलेल्या 14 गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा सावधानतेचा इशारा नगर परिषद व महसूल प्रशासनाने दिला आहे. शहरात रिक्षातील ध्वनिक्षेपक व ग्रामीण भागात दवंडीद्वारे हा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

1522 फूट जलसाठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पात सध्या 1518 फूट पाणीपातळीची नोंद झाली आहे. नाशिक व नगर भागातील पावसाचे पाणी प्रतिसेकंद प्रतिसेकंद 51 हजार क्युसेक्सने दाखल होत आहे. टक्केवारी 78 पर्यंत पोहोचली असून आणखी एक टक्का वाढल्यावर धरणातून विसर्ग करण्यात यावा. अशा सूचना यापुर्वीच जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. रिक्षातील ध्वनिक्षेपकाद्वारे “सावधान… कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरीकांनी खबरदार राहावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. तसेच तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी पाटेगाव, वडवाळी, वाघाडी, आपेगाव, मायगाव, नायगाव, नवगाव, आवडेऊंचेगाव, टाकळीअंबड, घेवरी, तुळजापूर व हिरडपूरी या गावांमध्ये दवंडीद्वारे नागरीकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.