15 लाख 98 हजार नोकऱ्या कुठे गेल्या! जयंत पाटील यांचा सवाल

महायुतीचे मंत्रिमंडळ दावो दौऱयावर जाते आणि दौऱयावरून आल्यावर येवढय़ा सामंजस्य करारावर सह्या झाल्या, त्यातून इतका रोजगार मिळणार अशा बातम्या येतात. पण प्रत्यक्षात रोजगार निर्माण होत नाही. यंदाच्या दावोस दौऱयानंतर 15 लाख 98 हजार नोकऱया देण्याची घोषणा करण्यात आली. पण कुठे आहेत त्या नोकऱया, असा सणसणीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.

लोकसभेत कौशल्य विकास विभागाने दिलेल्या उत्तरातून महाराष्ट्र प्रशिक्षणात पुढे आणि नोकरीत मागे असे चित्र पुढे आले आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 13 लाख 31 हजार 385 युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी फक्त 80 हजार 950 युवकांनाच नोकरी मिळाल्याची अधिकृत आकडेवारी पुढे आली आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट करीत महायुती सरकारचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राज्य राहिले आहे. पण 2014पासून मधला अडीच वर्षांचा काळ सोडला तर राज्यात 8 वर्षं तथाकथित डबल इंजिन सरकार आहे. आता तिसरं इंजिनही जोडले गेले आहे. पण राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात हे इंजिन फेल झाले आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

दहा टक्केही नोकऱया नाहीत
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण देण्यात तिसऱया क्रमांकावर आहे. पण नोकरी देण्यात 11व्या क्रमांकावर आहे. 13 लाख 31 हजार लोकांना प्रशिक्षण दिले. पण त्यातील फक्त 80 हजार लोकांना नोकरी देण्यात यश आले. म्हणजे 10 टक्के बेरोजगारांनाही हे सरकार नोकरी देऊ शकले नाही हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.