राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली, कंटदारांच्या आत्महत्या वाढतील; जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती

राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. ती परिस्थिती सुधारण्यासाठी जोपर्यंत सरकार काही ठोस पावले उचलत नाहीत  जोपर्यंत या आत्महत्या वाढत जातील. सरकारने झोपेचे सोंग घेणे बंद करावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरदचंद्र पवार) आमदार जयंत पाटील यांनी आज समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कंत्राटदाराने कर्जबाजारीपणातून नागपूरमध्ये आत्महत्या केली. पेनमाचा वेंकटेश्वर(पी.व्ही) वर्मा उर्फ मुन्ना वर्मा असे त्यांचे नाव आहे. कंत्राटदार वर्मा यांची विविध जिह्यात कामे सुरू होती. बीले थकल्याने ते आर्थिक संकटात होते. ते नागपूरच्या राजनगरच्या प्लॅटमध्ये एकटे राहात होते. तर त्यांचे कुटुंबीय हैदराबादमध्ये रहायला होते. या घटनेवरून जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

पोस्टमध्ये काय म्हटले आहे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पी.व्ही. वर्मा नावाच्या कंत्राटदाराने बिले थकल्यामुळे आत्महत्या केली आहे. त्यावर या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या राज्यातील शेतकरी तर आत्महत्या करतच होते. आता कंत्राटदारांच्या आत्महत्यांची संख्याही वाढत आहे. मागे काही महिन्यांपूर्वी सांगली जिह्यातील माझ्या वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. आता नागपूर येथील पी.व्ही वर्मा यांनी 40 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे सरकारी बिले थकल्याने आत्महत्या केली आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार होते. सरकारने झोपे सोंग घेणे बंद करून हालचाल करावी. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते! अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.