
निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत दिलेला निर्णय आजवर कोणत्याच पक्षाबाबत झालेला नाही. चिन्ह गोठवणे समजू शकतो. मात्र, पक्षच हिसकावून घेणे ही भाजपची खेळी निंदनीय असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
जयंत पाटील यांनी भगवान गडावर येत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार धनंजय मुंडे, महंत नामदेवशास्त्र्ााr उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, अंधेरीच्या पोटनिवडणुकीपूर्वी झालेल्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेना संपवण्यासाठी भाजपने उघड उघड कशी पावले टाकली ते सर्वांना दिसत आहे. आपण केलेला प्रकार अंगलट यायला लागला म्हणून भाजपचे बगलबच्चे सध्या राष्ट्रवादीवर बेछूट आरोप करीत आहेत. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांची मैत्री होती. त्यामुळे शरद पवार शिवसेना संपवतील या आरोपात तथ्य नाही.
धनंजय मुंडे म्हणाले, पक्षावर बंदी आणणे ही इतिहासात कधीच न घडलेली घटना आहे. घरातील लहान मुलांना विचारलं तरी हे कुणी केलं हे सांगतील. या निर्णयाने आश्चर्य झाले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणत असले तरी त्यात काहीही तथ्य नाही. त्यांना बहुतेक हे आधीच माहीत असावे, असा टोलाही मुंडे यांनी लगावला.


























































