
>> जयश्री संगीतराव
तमाम हिंदुहृदयाचा कप्पा ज्या रामायणाने व्यापला आहे, त्या रामायणाचे हृदयच मुळी राम आहे. ‘रमन्ते योगिन कण यास्मिन् स राम’ अर्थात योगीजन ज्यात रममाण आहेत तो राम आणि म्हणूनच एखाद्या गोष्टीत काही तथ्य नसेल, काही विशेष नसेल, तर आपण म्हणतो त्यात काही राम राहिला नाही. असा हा प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार. त्याने साऱयांचेच जीवन जसे व्यापले आहे, तसेच त्याच्याही आयुष्यातील अनेक अशा व्यक्तिरेखा आहेत की त्यांच्याशिवाय त्याचं आयुष्य अपूर्ण आहे त्यातीलच महत्त्वाची व्यक्ती म्हणजे पत्नी सीता… जानकी.
रामाच्या आयुष्यात सीतेचे महत्त्व सर्वश्रुत आहे. स्वयंवरानंतर श्रीरामाबरोबर अयोध्येची वाट चालताना तिच्या मनात कितीतरी स्वप्ने फुललेली असतील. तिच्या पुढील आयुष्यात घडलेल्या प्रसंगाची पुसटशीही कल्पना तिला आली नसेल. राज्याभिषेक न होताच 14 वर्षे रामाला वनवास भोगावा लागला व पतीसवे तिनेही वनवासाची वाट धरली. यातून बाहेर पडते न् पडते तोच जनतेचा मान राखणे तिच्या नशिबी आले. पुन्हा पतीविरह आलाच. रघुकुलातील तिच्या पोटी आलेले वंश राजमहालाऐवजी आश्रमात जन्मले, वाढले. आयुष्याच्या उत्तरार्धातही तिला अनेक सत्त्वपरीक्षांना तोंड द्यावे लागले. अशी ही जानकी जिच्या नशिबात ‘राजयोग तर होता, पण राजभोग नव्हता’ असेच म्हणावे लागेल.
ती म्हणते, ‘भूमाते, तुझी लेक सीता आज उद्विग्न झालीय. माते तू मला तुझ्या उदरात जागा दे. मी खरंच पतिव्रता असेन तर तू मला अव्हेरणार नाहीस. तुझ्याच उदरी जन्मले ना मी. वारंवार माझ्या चारित्र्यावर उठणारे प्रश्नचिन्ह तुला तरी सहन होतात का? सगळं आयुष्य आज माझ्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं आहे. स्वयंवर, वनवास ते अपहरण. परत आल्यावर गर्भावस्थेत असताना पुन्हा नाथांनी केलेला माझा त्याग, मुनिवर्य वाल्मीकींनी स्वीकारलेले माझे पालकत्व, माझ्या बाळांचा जन्म, त्यांचं आश्रमात झालेलं संगोपन. सारं सारं मला आठवतंय. हे सारं मी सहन केलं. कारण आशा होती काळीकुट्ट अमावस्या माझ्या आयुष्यातून जाईल आणि मला पुन्हा दिसतील पावलं माझ्या श्रीरामाची. तसं काहीसं दिसण्याची आशाही दिसली. राजसूय यज्ञाचा अश्व जेव्हा आश्रमाशेजारी लव-कुशाने अडवला, तेव्हा किती घाबरले होते मी? वाटलं काही अघटित घडणार? पण तो क्षण पिता-पुत्रांना भेटवणारा ठरला. मुनिवर आम्हाला दरबारात घेऊन गेले. किती बावरले होते मी. किती वर्षांनी बघणार होते मी माझ्या देवतेला.
दोन्ही बाळांचे हात धरून मी मंद मंद पावलं टाकत बाबांच्या मागे दरबारात प्रवेश केला. सारे प्रजाजन जयजयकार करत होते. अयोध्येचे राजपुत्र माझ्यासवे होते. सारा दरबार गच्च भरला होता. आदरणीय गुरुवर्य, माता कौशल्या, सुमित्रा, कैकयी. सगळ्यांच्याच नजरा आपल्या कुळाच्या वंशावरून हलत नव्हत्या. कोणीच काही बोलत नव्हते. बोलत होती ती फक्त नजर. माझी नजर मात्र स्थिरावली होती समोर मध्यभागी सुवर्णासनावर विराजमान असलेल्या माझ्या प्राणप्रिय नाथांवर, प्रभू रामचंद्रांवर. क्षणभर आमची नजरानजर झाली. तो एक कटाक्ष सारी व्यथा सांगून गेला आणि माझी नजर क्षणभर स्वतवरच रुसली. कारणही तसंच होतं.
राजसूय यज्ञ ठरल्याचं कळल्यानंतर मनात आशंका आली की माझ्या नाथांनी दुसरा विवाह तर केला नसेल ना? कारण यज्ञाचं यजमानपद स्वीकारताना वामांगाईचा मान कोणाला असेल, जो माझा आहे. गुरुवर्यांकडून जेव्हा कळलं की माझी सोन्याची प्रतिमा करून ती त्यांच्याबरोबर विराजमान होती, तेव्हा मलाच माझी लाज वाटली. आजही त्यांच्या डाव्या बाजूचं आसन रिक्तच होतं. जे मला खुणावत होतं. पापण्यांनी कितीही सांभाळलं तरीही अश्रू काही ऐकेना ते गालावर ओघळू लागले. मी या विचारातच गढून गेले. तेवढय़ात बाबांचे, महर्षी वाल्मीकींचे शब्द कानावर आले, ‘जानकीच्या पावित्र्यावर आशंका कोणी घेऊच कसं शकतं. मी मुनी वाल्मीकी असं सांगतोय की जर तिचं पावित्र्य कलंकित असेल, जर तिच्या पोटी जन्मलेली ही बालकं श्री रामचंद्रांची नसतील तर मी तीन हजार वर्षं केलेली तपश्चर्या, मी मिळवलेलं पुण्य मातीमोल होईल.’
काय चाललंय काही कळत नव्हतं. एवढंच कळत होतं की, कोणीतरी पुन्हा माझं पावित्र्य सिद्ध करावं असा सूर लावला होता. सगळा दरबार स्तब्ध झाला. माझी नजर मात्र भात्यातून सुटलेल्या बाणासारखी नाथांच्या नजरेचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होती. त्यांचे लोचन मात्र तितकेच शांत होते. ओठ घट्ट मिटले होते आणि मुखकमल तितकंच करारी होतं. त्याही परिस्थितीत माझ्या मनात विचार आला, काय चाललं असेल त्यांच्या मनात? मला ठाऊक आहे, माझ्या चारित्र्याबद्दल त्यांच्या मनात जराही संभ्रम नाही किंवा किंतु परंतु नाही. वाटलं ते आता उठतील आणि आपल्या जानकीला शेजारी बसवतील. आमच्या सहवासाला लागलेलं इतक्या वर्षांचं ग्रहण सरेल. अन् प्रकाशाची वलयं येतील. माझे प्राण माझ्या कानात गोळा झाले. पण प्रभू रामचंद्रांचं मन सारं सारं सांगून गेलं. प्रजेप्रति असलेलं त्यांचं कर्तव्य, राजाचे अधिकार, पत्नीप्रेमावर, पती कर्तव्यावर मात करून गेले.
मी जनतेचा कल ओळखून माझं पावित्र्य सिद्ध करावं असाच काहीसा सूर दिसला. मनात आलं मी पुन्हा माझ्या चारित्र्याची परीक्षा देण्यापरीस मी स्वतला त्यांच्यापासून दूर करूनच माझं पावित्र्य सिद्ध करेन. म्हणून म्हणते, माते जर मी पवित्र असेन तर तू मला उदरात घेशील का तुझ्या. कदाचित माझं भाग्य या रघुकुलाचा वंश जन्माला घालण्याइतकंच असेल. त्यांची अपत्यं त्यांच्या स्वाधीन केली. उरला प्रश्न तो फक्त जानकीचा.
पिता जनकाची वात्सल्याची नजर, तिन्ही मातांच्या नजरेतील माझं पावित्र्य मला स्पष्ट दिसत होतं. मला एक महाधिपती, प्रजेप्रती कर्तव्यदक्ष असलेल्या माझ्या पतीवर कठोर निर्णय घेण्याचा कटू प्रसंग कदापी आणायचा नव्हता. म्हणून तुला माझी विनंती तू मला उदरात सामावून घे. आयुष्यातील इतक्या प्रसंगात इतके क्लेश मनाला कधीच झाले नव्हते, जे या क्षणी झाले. मी डोळे मिटून घेतले घट्ट आणि हात जोडून प्रार्थना करू लागले, हे भूमाते मला जवळ कर. मला शांती दे. त्रिलोकातून सूर ऐकू येऊ लागले- ‘जन्मजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा’ अगदी खरं आहे माते. तू दुभंगताना मला दिसतेय. तू माझ्यासाठी पाठवलेल्या शेषावरचे आसनही मला दिसू लागलंय. मी माझ्या मातेची पुन्हा आळवणी केली. माते… माते येतेय मी. फक्त एकदाच माझ्या प्रभू रामचंद्रांना माझ्या नाथांना एकवार डोळे भरून बघते, त्रिवार वंदन करते आणि तुझ्या कुशीत शिरते. कधीही दूर न होण्यासाठी. ही माझी शेवटची विनंती मात्र तुझ्या पायाशी आहे…
तुझ्या प्रेम वात्सल्याचा ठेव पाठीवरती हात
जानकीचे समर्पण केवळ तुझ्या उदरात
माते तुझ्या उदरात…‘





























































