दीपशिखा – दमयंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>जयश्री संगीतराव

दमयंतीच्या प्रेमकथेचा उल्लेख महाभारतातही मिळतो. नल-दमयंतीच्या प्रेमाची, त्यांना भोगाव्या लागलेल्या यातनांची, सर्वस्व संपल्यानंतरही पुन्हा सर्व मिळवून जीवन पूर्वपदावर आणण्याची कथा महर्षी बृहदच ऋषींने युधिष्ठिराला कथन केली. भावंडांना आपल्या चुकीमुळे वनवास भोगावा लागला या विचाराने पश्चाताप झालेल्या युधिष्ठिराचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ऋषींने सांगितली असावी. नल-दमयंतीच्या प्रेमाचे वर्णन करताना दोघांच्या प्रेमातला दुवा म्हणून सोनकळी रंगाच्या राजहंसाचे वर्णनही त्यात आढळते. कदाचित ती कल्पना किंवा दंतकथाही असू शकते. राजपद असूनही भाळी आलेले भोग त्यांनाही चुकले नाहीत. आलेल्या दुराव्यातूनही त्यांच्यातील प्रेमाने पुन्हा त्यांचे मिलन घडवून आणले. पुढे नल-दमयंती हे नाव इतके घट्ट जोडले गेले की त्यांच्यापैकी कोणाचाही उल्लेख करायचा झाला तर कधीच एकेरी केला जात नाही.

लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे म्हणतात. आयुष्यात भोगावे लागणारे प्राक्तन जन्माला येतानाच भाळावर सटवाईने कोरले असते असे म्हणतात. पण हे बरे-वाईट क्षण जगताना एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम ते जगताना सुकर करून जातात. त्यावर विजय मिळतो याचा अनुभव आम्ही उभयतांनी आमच्या आयुष्यात पुरेपूर घेतला आहे. अतूट प्रेमाला पर्याय नाही याची खात्री मला नक्की  झाली. विदर्भातील भीम राजाच्या पोटी जन्म घेतला. रूपवान, गुणवान आणि स्वतवर पूर्ण विश्वास हे मला मातापित्याकडून वारसा हक्काने मिळालं. दिसामासी वयाबरोबर सौंदर्यही द्विगुणित होत होतं. राजकन्या… त्यामुळे रूपागुणांची कीर्ती दाही दिशांना पसरली होतीच. विवाहाचे, स्वयंवराचे वारेही वाहू लागले होते. अशातच निषाध देशाचा राजा वीरसेन पुत्र नल याच्या परामाची, गुणांची कीर्ती माझ्यापर्यंतही पोहोचलीच होती. केवळ वर्णन ऐकून त्याची एक छबी हृदयात तयार झाली होती. त्यांच्या जलाशयात असलेल्या सोनकळी राजहंसावर त्याचं असलेलं प्रेम त्याच्याशी तासन् तास करत असलेल्या संवादाची चर्चाही दूरवर होतीच. सौंदर्यावर, पशुपक्ष्यांवर मन जडवणारा असा राजपुत्र माझी झोप उडवून गेला. अशातच माझ्या नावाची चर्चाही त्याच्या कानावर गेली होतीच. तेही स्वयंवराची वाट बघत होते. आम्ही दोघांनीही एकमेकांना बघितलं नव्हतं. ना संवाद साधला होता. पण हृदयाला हृदयाची भाषा कळली असावी आणि आत्ममिलन केव्हा झालं हे कळलंच नाही. दिवसरात्र त्याचाच विचार करून मला अन्न, पाणी गोड लागेना. मनात एकच ध्यास मिलनाचा! त्यामुळे प्रकृती ढासळू लागली. राजकन्या मी. राजवैद्य झाले, दवापाणी, दुवा सारं झालं. पण तब्येतीत सुधार होईना. कोणालाच काही कळत नव्हतं काय झालंय ते. फक्त मला ठाऊक होतं. माझं माझ्या मनातलं. माझी अवस्था अशी झाली होती की कसं सांगू, काय सांगू. माझा मलाच सवाल पडला. न बघता नलराजाचा प्रेमरोग हृदयी जडला होता.

दवा न लागे ना दुवाही लागे

शीण जीव हा होऊ लागला

उपाय यावर एकच आता

वरणे केवळ नलराजाला

माझी प्रकृती ढासळतच होती. सारे राज्य विचारात पडले. बाबांना वाटले विवाह केल्यावर कदाचित माझ्या प्रकृतीत सुधार होईल. त्यांनी माझे स्वयंवर मांडले. देशोदेशी निमंत्रण गेले. माझ्या रूपाची कीर्ती देवादिकांपर्यंत पोहोचली होती. इंद्र, वरुण, अग्नी… माझ्याशी विवाह करण्यास उत्सुक होते. त्यांनाही नल-दमयंतीच्या अबोल  प्रेमाची कुणकुण लागलीच होती.

 देवांनी शक्कल लढवून राजाला मला त्यांच्यापैकी एकाशी विवाह करण्यास तयार करण्यासाठी दूत पाठवले. राजा वचन देऊन बसला. देवाच्या शापाला घाबरून त्यांनी आपले प्रेम मनात दडवून माझ्याकडे तिन्ही देवांची प्रशंसा  करण्यास सुरुवात केली. माझं प्रेम वरवरचं थोडंच होतं. ते काही तयार होईना. देवांचा हा डाव फसला. शेवटी त्यांनी एक युक्ती केली आणि स्वयंवर मंडपात नल राजासह आले. मी वरमाला घेऊन  तयार होतेच. मी राजा कोठे आहे म्हणून शोधू लागले. एक नाही दोन नाही तर चार चार नलराजे मला दिसू लागले. आता मात्र माझी सत्त्वपरीक्षाच होती. कसं ओळखावं माझ्या प्रियाला? भांबावले, घाबरले. मनातल्या मनात ईश्वराचा धावा करू लागले. माझ्या प्रेमावर विश्वास होताच. माझ्याबरोबर खऱया नलाच्या डोळ्यातले भाव नजरेने टिपले. वरमाला त्याच्या गळ्यात घालून दमयंती नल राजाची झाली.

सुरळीत संसार सुरू झाला. दोन गोंडस मुलांनी बहरला. पण इतकं सरळ सोपं साधं असेल तर ते आयुष्य कसलं?  द्युताची आवड असलेल्या राजाचा छंद व्यसनात कधी बदलला कळलंच नाही. संपत्ती गेली, राज्य गेलं. निर्धन होऊन राज्याबाहेर त्याची रवानगी झाली. रानावनात भटकू लागलो. मुलांना याची झळ लागू नये म्हणून त्यांना आजोळी पाठवलं. एकमेकाच्या प्रेमाने दोघेही एकमेकांना सांभाळत होतो. आपण आपलं राज्य परत मिळवू ही आशा मनात होतीच. अर्धपोटी राहणं, अंग झाकण्यापुरता कपडा होता. तशा अवस्थेत भटकत राहिलो. पण एक दिवस सूर्य उगवला तो माझी परीक्षा बघण्यासाठीच बहुधा. राजाला इकडे तिकडे शोधू लागले. वाटलं रानात काहीतरी कंदमुळाच्या शोधात गेले असतील. सूर्य मावळतीला झुकू लागला, तसा मनातही काळोख दाटू लागला. काय करू? कुठे शोधू? काय घडलं असेल? विचार करून मन कातर झालं. मजल दरमजल करत मी माझ्या माहेरी पोहोचले. काय झालं असेल? काही घातपात तर झाला नसेल ना? पण मन ते मानायला तयार होईना. खरं तर मी त्यांची अर्धांगिनी. त्यांचे भोग ते माझे भोग. सारं हसत हसत सहन करत होतो. मग असं असताना मला एकटीला सोडून ते कसे जाऊ शकले? विचार करून मन बधिर झालं. पण प्रेमावरचा विश्वास स्वस्थ बसू देईना. ते परत येतील अशी पक्की खात्री होती. अशातच जवळच्या राज्यात एक राजा वेष बदलून सारथ्याचं काम करतोय अशी माहिती कळताच मन आनंदाने उसळ्या मारू लागलं. काय करू? कशी पोहोचू राजापर्यंत, कळेना. मी बाबांकडे हट्ट धरला माझं पुन्हा स्वयंवर मांडा. देशोदेशी निमंत्रण धाडा. बाबांनाही आश्चर्य वाटलं, पण लेकीच्या कर्तृत्वावर, तिच्या खऱया प्रेमावर त्यांचा विश्वास होता. सारं ठरलं. बाबांना स्वयंवरासाठी एक अट घालायला सांगितली. एकाच दिवसात जो स्वयंवर मंडपात पोहोचेल त्याचाच मी विचार करेन. बाबा संभ्रमात पडले. लेकीच्या मनात काय चाललंय याचा त्यांनाही अंदाज लागेना.

स्वयंवराचा दिवस उजाडला. समय मर्यादा पोहोचण्याची होतीच. त्यामुळे प्रत्येक राजा जिवाच्या आकांताने प्रयत्न करणार हे ठाऊक होतं. मोजकेच राजे पोहोचले. माझे डोळे भिरभिरत होते. कारण शेजारच्या देशाचा राजा स्वयंवरासाठी वेळेत पोहोचणार याची खात्री होती. कारण त्याचा सारथी नल राजा होता आणि नल राजाच्या सारथ्य वेगाची मला कल्पना होती अन् खात्रीही होती. एका राजाच्या सारथ्यावर नजर जाताच आतल्या मनाने हुंकार दिला. हाच नलराजा! पण त्याचं शरीर इतकं काळं ठिक्कर कसं? रूपवान राजा असा का व्हावा? पण तो हाच आहे.  अंतर्मन सांगू लागले. सारे राजे सोडून त्यांच्या गळ्यात मी वरमाला घातली. त्यांचं रूप का बदललं हा विचारही मनाला शिवला नाही, ना मनात कोणती शंका आली. सर्पदंशामुळे त्यांच्या शरीरात विष पसरलं आणि  शरीर काळं पडलं, हे नंतर कळलं. बाबांनाही आनंद झाला. बाबांच्या मदतीने आमचं राज्य परत मिळवता आलं. नल-दमयंती पुन्हा एकत्र आले. हे सारं आठवताना एक गोष्टीने मात्र मन कुरडतडलं. राजाने मला रानावनात एकटीला का सोडलं असेल? माझं प्रेम कमी पडलं असेल का? हा विचार मनात येतो तसा क्षणात निघूनही जातो. अंतर्मन म्हणतं, वेडे तुला त्रास होऊ नये म्हणून. तुझी हाल-अपेष्टा त्यांना बघवत नव्हत्या. तू परत तुझ्या माहेरी जावंस म्हणून ते तुला सोडून गेले असतील. कारण काहीही असू दे, आमची खरी प्रीती मात्र मिळाली. नल-दमयंती पुन्हा एकत्र आले. कधीही दूर न होण्यासाठी, विभक्त न होण्यासाठी.

प्रीत मनीची असेल खरी तर

सहस्र विघ्ने पार होती

ललाटीच्या भाग्यरेषा

असाध्य तेही साध्य करती…

[email protected]