जयदत्त क्षीरसागरांच्या विजयासाठी ऊसतोड कामागरांनी फुंकले शिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जयदत्त क्षीरसागरांच्या विजयासाठी आता ऊसतोड कामगारांची फळी मैदानात उतरली आहे. कोयता उंचाऊन ऊसतोड कामगारांनी यल्गार करत धनुष्यबाणाला साथ देण्याची साद घातली. हजारो ऊसतोड कामगार आज मांजरसुंब्यामध्ये एकवटले. यावेळी ऊसतोड कामगारांशिवाय गुलाल लागत नाही हा इतिहास असल्याचा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

बीड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये बालाघाटावरील मांजरसुंबा येथे मुकादम आणि ऊसतोड कामगारांची बैठक झाली. ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष केशवराव आंधळे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, श्रीमंत जायभाये, गोरख रसाळ, राणा डोईफोडे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा आशिर्वाद असल्याशिवाय गुलाल लागत नाही. हा इतिहास आहे. लोकसभेच्या वेळी अनेक पैजा लागल्या. अफवा पसरविल्या गेल्या. जातीयवादाचे विष सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले. प्रीतम मुंडे यांना अडचण निर्माण होतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण बहाद्दर मतदारांनी आणि ऊसतोड कामगारांनी इतिहास घडवला. मुकादम संघटना आणि ऊसतोड कामगार मजूर, भक्कमपणे पाठीशी असला तर नक्कीच विजयाचा गुलाल लागतो हाच इतिहास आहे.

सोशल मिडियावर अफवा पसरविण्याचे काम सध्या विरोधक करत आहेत. त्यांना काय करायचे ते करू द्या, आपण आपली दिशा ठरऊन काम करूयात, 24 तारखेला त्यांचा सामुदायिक रडण्याचा कार्यक्रम होईल हे नक्की, त्यांचा पराभव तर नक्की आहेच, अस्तित्व टिकविण्याची त्यांची धडपड आहे. दारूण पराभव होण्याच्या भितीने आता अनेक उपाय ते करत आहेत. पण मतदार चाणाक्ष आहे. मुकादम संघटना आणि ऊसतोड कामगार माझ्या माठीशी उभी राहिली त्यामुळे मला मोठे मताधिक्य मिळेल यात दुमत नाही. ऊसतोड कामगार आणि संघटनेच्या भविष्यात अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका ठेऊ. तुमचे प्रश्न सोडवणे अत्यंत महत्वाचे आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तो सुटणे काळाची गरज आहे. त्यासाठी मोठे प्रकल्प होणे आवश्यक आहेत. म्हणूनच केंद्रात आणि राज्यात जे सरकार येणार आहे त्या सरकारमध्ये आपण सहभागी झाले पाहिजे. धनुष्यबाणाला मतदान करून मला पाठबळ द्या असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले. प्रस्ताविक करताना लालासाहेब घुगे म्हणाले, ऊसतोड मुकादम संघटनेला भविष्यात मदत व्हावी, त्यांचे प्रश्न सोडवावेत त्यासाठी जयदत्त क्षीरसागरांचे पाठबळ आवश्यक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले तर ऊसतोड मजूर महामंडळाचे माजी आमदार केशवराव आंधळे यांनी बोलताना म्हटले. ऊसतोड कामगार आणि मुकादमांची बैठक होत असते. या बैठकीत निर्णय ठरतो आणि त्या निर्णयाप्रमाणे आम्ही उमेदवार निवडत असतो. आता आमचे ठरले आहे. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर हेच आपले उमेदवार आहेत. त्यांना निवडून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यावेळी दत्तोबा भांगे, नितीन धांडे, रतन गुजर आदी उपस्थित होते.