
सामना प्रतिनिधी, बीड
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून मराठवाड्यात त्याची तीव्रता अधिक आहे त्यामुळे गावागावात टँकरची संख्या वाढवणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा 2011 ची जनगणना ग्राह्य धरून केली जात आहे. माणसी 20 लिटर पाणी पुरवठा होत आहे मात्र 2019 ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे केली आहे.
संपूर्ण राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यातल्या त्यात मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून बीड जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ आणि घटलेली पाण्याची पातळी लक्षात घेता टँकरची संख्या वाढवणे गरजेचे आहे. सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असलेला 2011 च्या जनगणनेनुसार केला जात आहे. 2011 ते 2019 या दरम्यान वाढलेली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून आज माणसी 20 लिटर पाणी पुरवठा होत असला तरी तो अपुरा आहे. 8 वर्षातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन टँकरच्या खेपा वाढवणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई असून कुंडलीका प्रकल्पातून पाणी पुरवठा केल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.




























































