
>>मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगत विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या वेळी मी बँकेत होतो. संध्याकाळचे हिशेब जमवत असताना दोन हजार रुपयांची तूट आली. त्या वेळेसचे दोन हजार म्हणजे तशी मोठी रक्कम होती. मग काय सगळ्या विथड्रावल्स, चेक्स उलटे पालटे करून शोधत बसलो आणि शेवटी ती विथड्रावल सापडली! कुणी मुस्लिम पेन्शनर होती. पत्ता पाहिला. कुठला तरी मोहल्ला एवढाच पत्ता होता आणि मी शोधत शोधत तिथेपर्यंत पोहचण्यात यशस्वी झालो! पण त्या अस्ताव्यस्त मोहल्ल्यात ती ‘खाला’ कशी शोधायची या विवंचनेत मी तिथल्या कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये गेलो. एक चहा मागवला. तेवढय़ात,
‘अरे साब, आप यहा?’
मी वर पाहिलं. एक वृद्ध व्यक्ती समोर उभी होती.
‘माफ किजिये मैने आपको पेहचाना नही!’
‘लेकीन हम आपको पेहचानते है. मै आपके बँक का पेन्शनर! बताइये कैसे आना हुवा.’
माझा जीव अर्धा भांड्यात पडला! मी त्याला सगळी हकीकत सांगितली आणि तो कागद दाखवला.
‘आप चाय पिजिये, मै अभी हाजिर हुवा!’ म्हणत तो त्या मोहल्ल्यात अदृश्य झाला! आणि माझा चहा संपेपर्यंत आलादेखील! त्याने तो कागद आणि दोन हजार रुपये माझ्या हातात ठेवले!
‘वो खाला अनपढ है, उसको गिनती भी नही आती! बेचारी हज जा रही है. उसने उसकी थैली मेरे सामने रखी और बोली, जो ज्यादा है वो ले जाओ!’
मी त्या वृद्ध गृहस्थांचे हात माझ्या हातात घेतले. पुनः पुन्हा आभार मानले.
‘आपका नाम?’
‘जी, मुझे जयदुल्ला खान बुलाते है!’ त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्यावर मी परतलो. त्या दिवसापासून जयदुल्ला खान या नावाने माझ्या आयुष्याचा बराच मोठा भाग व्यापून टाकला. साधारण सहा फूट उंची. डोक्याला मुंडासं गुंडाळलेलं, अंगात लांबलचक नेहरू शर्ट आणि खाली रंगीत लुंगी! सावळ्या चेहऱ्यावर गोल फ्रेमची चाळीशी, तिच्या आत गढूळलेले मोठे डोळे, राखलेली शुभ्र दाढी. एकूण आश्वासक देहबोली. बोलता बोलता कळलं की, यांचं वय शंभरच्यावर तीन वर्षे आहे! माझ्या अडीच पट मोठा हा गृहस्थ माझा मित्र होऊन गेला!
मला आठवड्याला एकदा स्टेट बँकेत जावं लागायचं आणि तो रस्ता त्या हॉटेलवरूनच जायचा. माझी ऑटो ते लांबूनच कसे ओळखायचे हे मला अद्याप न सुटलेले कोडे आहे. ते रिक्षाच्या समोर त्यांचे लांबसडक हात पसरून उभे राहायचे.
‘चाय पिजिये फिर जाइये!’ त्यांचा आग्रह मला मोडवायचा नाही. मग गप्पा व्हायच्या. एव्हाना त्यांच्या कुटुंबाची इत्यंभूत माहिती मला मिळाली होती. त्यांची मुलं पेन्शनीत निघाली होती! पण म्हातारा नेहमी आनंदात असायचा. बँकेत बरोबर एक तारखेला साडेदहाच्या ठोक्याला यायचा. आपला नंबर आला की पैसे घेऊन जाताना हात कपाळाला लावून आदाब फर्मावून निघायचा. त्यांनी कधी ओळखीचा फायदा घेतला नाही. अशी अजून दोन-तीन वर्षे गेली. आता खानसाहेब थकल्यासारखे दिसू लागले होते. नजरही कमजोर झाली होती. हातांना थरथरी सुटली होती. एकशे पाच वर्षांचा हा गृहस्थ अजूनही एकटाच यायचा. मी बँकेत सगळ्यांना बजावून ठेवले होते, जयदुल्ला खान आले की त्यांना न थांबवता त्यांना अगोदर पेमेंट करायचं.
एका महिन्यात ते आलेच नाहीत. मला चुटपुट लागून राहिली. दुसऱयाही महिन्यात जेव्हा त्यांची गैरहजेरी जाणवली तेव्हा मात्र मी अस्वस्थ झालो. एका रविवारी मुद्दाम त्या हॉटेलमध्ये गेलो. खांसाहेब दिसले नाहीत. नाही म्हटले तरी मी धास्तावलो. पैसे द्यायला गल्ल्यावर गेलो आणि सहज विचारल्यासारखं विचारलं,
‘आज जयदुल्ला खान साहब नजर नही आ रहे?’
गल्ल्यावरच्या त्या तरुण पोराच्या डोळ्यात पाणी आलं.
‘गये महिने मे उनका इंतखाल हो गया!’ माझी शंका बरोबर होती! गाईने त्यांच्या कुशीत शिंग मारलं म्हणून निमित्त होऊन ते गेले.
‘आपकी बहोत याद निकालते थे!’
मी सुन्न झालो होतो.
‘बहोत बुरा हुवा!’ काहीतरी बोलायचं म्हणून बोललो आणि चायचे पैसे ठेवले. त्याने ते तत्परतेने मला परत केले.
‘आपसे चाय के पैसे हम नही ले सकते साहब!’
‘क्यूं?’
‘उनका हुकूम हम कैसे टाल सकते है? वो हमेशा कहते थे, आपके चाय के पैसे उनके खाते मे लिखना!’
‘लेकीन अब वो तो नही रहे!’
‘त्याने आकाशाकडे पाहून हात वर केले आणि शांतपणे म्हणाला,
‘अब उनका खाता हम चलाते है! आते रहना साब, आपके बहाने उनकी याद ताजी होती रहेगी!’





























































