क्षीरसागर पत्ते ओपन करेनात, राजकारण्यांची धाकधुक वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

निवडणूक जवळ आली की जयदत्त क्षीरसागर एक तर आश्वासक चेहरा वाटतात नाही तर विजयातील मोठा अडथळा वाटतात. मुख्यमंत्र्याशी वाढलेली जवळीक पाहून राष्ट्रवादी एकीकडे खुष होते तर दुसऱ्याच क्षणाला क्षीरसागर – पवारांची बंद दाराआडची चर्चा त्यांना अस्वस्थ करते. जयदत्त क्षीरसागरांच्या मनात काय चालले याचा थांगपत्ता कोणालाच लागेना. क्षीरसागर पोटातले पाणी ही हलु देत नसल्याने राष्ट्रवादीतील क्षीरसागर विरोधकांची धाकधूक वाढली आहे.

जयदत्त क्षीरसागर म्हणजे बीड च्या राजकारणाला कलाटणी देणारं प्रस्थ. कोणाला हात द्यायचा आणी कोणाला हात दाखवायचा त्यावर निकालाची हवा बदलत असते, अतिशय शांत, संयमी, मनात काय चालले कोणालाही कधीच थांगपत्ता लागणार नाही. दिशा एकीकडे दाखवायची मार्गक्रमण दुसरीकडे करायचे या फॉरमुल्यामुळे विरोधकाना नेहमीच बुचकळ्यात टाकण्याचे काम झाले आहे. अलीकडच्या काही वर्षांत स्वकीयच त्यांचे विरोधक झाले आहे, आपले प्रस्थ वाढवण्यासाठी राष्ट्रवादी मधील गट – तट एकमेकांच्या विरोधात शुड ठोकून उभे असतात. क्षीरसागर कुटूंबामध्ये पडलेल्या फुटीचा फायदा जास्त राष्ट्रवादी च्या नेत्यांनीच घेतला आहे. आताच बीड नगर पालिका पोट निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे अधिकार जयदत्त क्षीरसागर गटाकडे नव्हे तर पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या कडे देण्यात आले होते. मिळालेल्या या संधीचे सोने करत संदीप क्षीरसागरांनी अपक्ष म्हणून उभा केलेल्या जयदत्त क्षीरसागराच्या उमेदवारीचा साडेतीनशे मताने पराभव केला. हा विजय संदीप क्षीरसागरासाठी जसा मैलाचा दगड ठरला तसा चुलत्यासाठी जिव्हारी लागणारा पराभव होता. जयदत्त क्षीरसागरांनी राष्ट्रवादी सोडावी अशीच परिस्थिती निर्माण केली जात आहे ते पक्ष सोडतील की नाही, नसतील सोडत तर मग त्यांना लोकसभेला उभे करा, पक्षाच्या कार्यक्रमात मानहानी करा, श्रेष्ठीचे काने भरून द्या असा उपक्रम अनेकांकडून राबवला जात असतो. मात्र त्यांना ही जयदत्त क्षीरसागर म्हणतात काही ही झाले तरी क्षीरसागर पत्ते ओपन करत नाही आहेत. कधी पंकजा मुंडे सोबत प्रवास करतात, कधी मुख्यमंत्र्याशी जवळीक वाढवतात. भाजपामध्ये जाण्याची चर्चा सुरू झाली की तिकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बंद दारा आड चर्चा करतात. तर कधी भुजबळाशी संधान बांधतात तर कधी सवता सुभा उभारण्याचा प्रयत्न करतात. जयदत्त क्षीरसागर यांच्या दबावतंत्र राजकारणामुळे राष्ट्रवादी अस्वस्थ आहे तर राष्ट्रवादी चे जिल्ह्यातील नेते बुचकळ्यात पडले आहेत. क्षीरसागर अंतिम निर्णय केव्हा घेतात याकडे विरोधकांचे नव्हे तर राष्ट्रवादीतील त्यांच्या विरोधकांचे लक्ष लागले आहे.