
सामना ऑनलाईन । मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांना बुधवारी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षप्रवेशानंतर बोलताना क्षीरसागर यांना राष्ट्रवादीवर हल्ला चढवला, तसेच आपण शिवसेनेमध्ये प्रवेश का केला हे देखील सांगितले.
जयदत्त क्षीरसागरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, घड्याळ काढलं अन् ‘शिवबंधन’ बांधलं
क्षीरसागर म्हणाले, अनेकांनी मी एक्झिट पोल पाहिल्यानंतर निर्णय घेतला असे म्हटले. परंतु एक्झिट पोल पाहून मी हा निर्णय घेतलेला नाही. मी यापूर्वीच हा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आलेले असताना माझा निर्णय झालेला होता, असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले. परंतु त्यावेळी काही कारणास्तव पक्षप्रवेश झाला नाही.
तसेच जो पक्ष ताकदीने वाढवला, ज्या पक्षाला सहा-सहा आमदार दिले, 2014 च्या लाटेतही एकटा निवडून आलो, असे असतानाही पक्षात माझी कुचंबणा होऊ लागली, तोच पक्ष माझी कोंडी करू लागला. त्यामुळे मी मनाशी निश्चय केला. कार्यकर्तेही म्हणाले आता संयमाची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे मी निर्णय घेतला. माझ्या मनात स्व. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून शिवसेनेचे आकर्षण होते. जात, पात, धर्माचे बंधन न मानणाऱ्या या पक्षात जाण्याचा निर्णय मी घेतला, असेही क्षीरसागर यावेळी म्हणाले.


























































