जयदत्त क्षीरसागरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, घड्याळ काढलं अन् ‘शिवबंधन’ बांधलं

सामना ऑनलाईन । मुंबई

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी शिवसेना भवनमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

एक्झिट पोल आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या पक्षप्रवेशाचा संबंध नाही. चांगले कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत, याचा आनंद आहे. तसेच बीडमध्ये आता जोमाने काम करून शिवसेनेला मजबूत करण्याची आणि बलवान करण्याची जबाबदारी क्षीरसागर यांच्यावर नक्कीच देणार आहे. तसेच मनाप्रमाणे काम करण्याची जी तुमची इच्छा होती, ती इथे तुम्हाला करायला मिळेल,  अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

तर पक्षप्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया देताना क्षीरसागर म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून शिवसेनेचे मला आकर्षण होते. जात, पात, धर्माचे बंधन न मानणाऱ्या या पक्षात जाण्याचा निर्णय मी घेतला.

लोकसभा निवडणुकीचे 23 मे रोजी निकाल लागणार आहेत. एक्झिट पोलमुळे विरोधकांच्या गोटामध्ये चिंता पसरलेली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसला क्षीरसागर यांनी हादरा दिला आहे. या हादऱ्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला दीर्घकाळासाठी सहन करावे लागतील असे बीड जिल्ह्यामध्ये बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांची संपूर्ण ताकद महायुतीसाठी पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या होत्या. केजमध्ये भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्यासाठी त्यांनी 15 एप्रिल रोजी सभा घेतली होती. या सभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. मी राष्ट्रवादीला बाजूला सारले आणि राष्ट्रवादाला जवळ केले. जेथे जातो तेथे प्रामाणिकपणे काम करत असतो. राष्ट्रवादीत ही निष्ठेने काम केले पदरात काय पडलं, असा सवाल उपस्थित करून आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. बीड जिल्ह्यात घडळाची टिकटिक आता बंद होणार राष्ट्रवादाला बळ मिळणार असे क्षीरसागर या सभेत म्हणाले होते.