बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने क्षीरसागरांना चुचकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

नेहमी गृहीत धरणाऱ्या राष्ट्रवादीला हिसका दाखवण्यासाठी जयदत्त क्षीरसागरांनी प्रेशर पॉलिटिक्सचा वापर केला आणि प्रेशर पोलिटिक्सची मात्रा राष्ट्रवादीला लागू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास कामाच्या शुभारंभाच्या माध्यमातून आम्हाला गृहीत धरू नका जणू हा मॅसेज राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींपर्यंत पोहोचला आणि क्षीरसागरांना चुचकारण्याचा सल्ला दिला गेला. म्हणूनच मुख्यमंत्र्याच्या बीड दौऱ्यानंतरही जयदत्त क्षीरसागर आमचे नेते आहेत असा राग राष्ट्रवादीकडून आळवला जाऊ लागला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागरांना दुखावणे पक्षाला हिताचे नाही. पुढे काहीही होवो आज क्षीरसागरांना अंगावर का म्हणून घ्यायचे त्याचा फटका राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला बसेल. त्यापेक्षा आज तरी जयदत्त क्षीरसागरांना चुचकारले तर काय बिघडले हा मॅसेज बहुतेक श्रेष्ठींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला असावा. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामाचे शुभारंभ करून घेतले. विकास निधी त्यांनी दिला, विकास कामाचा शुभारंभही त्यांच्याच हस्ते केला पाहिजे. हिच आपली संस्कृती असल्याचे सांगत राष्ट्रवादीवर दबावतंत्राचा वापर करण्यात क्षीरसागराना यश मिळाले. मुख्यमंत्रांच्या बीड दौऱ्याचा जाब विचारण्याचे धाडस राष्ट्रवादीत कोणी केले नाही उलट विकास कामाचा शुभारंभ, यात राजकारण काय? असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित करत आहेत. राष्ट्रवादीचे जयंत पाटील असो की विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे. यांनी जयदत्त क्षीरसागरांच्या बीडच्या कार्यक्रमावर प्रतिक्रिया देतांना सावध भूमिका घेतली. यावरूनच आगामी लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागराचा पुरेपूर वापर करून घ्यायचा हा उद्देश राष्ट्रवादीचा असू शकतो.