
जिल्ह्याच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे आहेत. पराभवाची कारण मीमांसा शोधू, असे हताश होऊ नका. मी खचलो नाही तुम्ही ही खचू नका. नव्या जोमाने कामाला लागू, अनेक पराभव मी पाहिले आहेत, पचवले आहेत, एक पराभव हा अल्प विराम असतो तो पूर्ण विराम ठरणार नाही ,पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊ असा आशावाद देत जयदत्त क्षीरसागरांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.

बीड मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये अन शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती. शेकडो लोक जयदत्त क्षीरसागरांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जयदत्त क्षीरसागर पुढे म्हणाले, केंद्रात अन राज्यात एका विचाराचे सरकार आहे. विकासाचा वेग आगामी काळात मंदावणार नाही. याची काळजी घ्यावी लागेल. आपला पराभव आपण स्वीकारत आहोत., अनेक कारणे असतील या पराभवाला. त्याची कारणमीमांसा करू. सर्व शिवसैनिकांनी अन कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. स्वतःच्या घरातील उमेदवार समजून परिश्रम घेत होते त्याची मी पाठ थोपटत आहे. मी चाळीस वर्षाच्या राजकरणात अनेक पराभव पाहिले. ते पचवले, एका पराभवाने सगळे संपले असे नसते. हा अल्प विराम आहे, पूर्ण विराम नाही. मी खचलो नाही, अन खचणार नाही, तुम्ही ही खचू नका. असा धीर देत पुन्हा जिल्ह्याच्या भल्यासाठी आपण नव्या उमेदीने कामाला लागू असे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, किशोर काळे हे उपस्थित होते.
























































