झोपेसाठी फक्त साडेचार तास; जेईईच्या विद्यार्थ्याचे रोजचे टाईम टेबल व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेईई, नीट, यूपीएससी या देशातील सर्वात प्रतिष्ठत आणि तेवढय़ाच कठीण स्पर्धा परीक्षा मानल्या जातात. या परीक्षा क्रॅक करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱया अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन कष्टाचे असते. रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱया अशाच एका 17 वर्षीय जेईईच्या विद्यार्थ्याचे दैनंदिन टाईम टेबल ‘एक्स’वर व्हायरल होत आहे. मिस्टर आरसी नावाच्या युजरने आपल्या 17 वर्षीय मित्राच्या हस्तलिखित टाईम टेबलचा फोटो शेअर केला असून ‘जेईईची तयारी करणाऱया जवळच्या मित्राचे वेळापत्रक’ अशी कॅप्शनही फोटोसोबत आहे.

टाइम टेबलचा स्क्रीनशॉट या मुलाच्या दैनंदिन कामासाठी, झोपेसाठी आणि अभ्यासासाठी असलेला वेळ दर्शवितो. जेईईची तयारी करणारा हा तरुण मध्यरात्री झोपल्यानंतर दररोज पहाटे साडेचार वाजता उठतो. तो फक्त साडेचार तासांची झोप घेतो. उर्वरित दिवस उजळणी, क्लासेसना उपस्थिती, इतर काम आणि नोट्स पूर्ण करण्यात घालवतो. सुट्टीसाठी किंवा इतर कामांसाठी क्वचितच त्याच्या टाईम टेबलमध्ये वेळ दिला आहे. स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी या विद्यार्थ्याने टाईम टेबलच्या खाली एक प्रेरणादायी कोटदेखील लिहिला आहे…‘तुम्हाला हा दिवस पुन्हा कधीही मिळणार नाही, म्हणून येणारा दिवस मोजा.’ नेटिझन्स मात्र या टाईम टेबलमुळे चिंतेत पडले आहेत.