
अमेरिकेतील ‘हाऊस डेमॉक्रॅट्स’ने गुरुवारी कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधील फोटोंच्या फाईल्स नवा भाग प्रसिद्ध केला आहे. दिवंगत फायनान्सर एपस्टीनशी संबंधित फेडरल फाइल्स सार्वजनिक करण्याच्या डेडलाईनच्या आदल्या दिवशी हे फोटो समोर आल्याने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावर दबाव वाढला आहे.
काय आहे फोटोंमध्ये?
प्रसिद्ध करण्यात आलेल्या ६८ फोटोंमध्ये विविध देशांचे पासपोर्ट आणि ओळखपत्रांचे समावेश आहे. यातील बहुतेक तपशील गोपनीयतेसाठी पुसून टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यात युक्रेन आणि रशियासह अनेक देशांतील महिलांचे पासपोर्ट असल्याचे दिसत आहे.
या फोटोंमध्ये प्रख्यात विचारवंत नोम चॉम्स्की एका विमानात एपस्टीनसोबत बसलेले दिसत आहेत. तसेच, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स एका महिलेसोबत उभे असल्याचे छायाचित्रही समोर आले आहे (त्या महिलेचा चेहरा पुसट करण्यात आला आहे). याशिवाय, चित्रपट निर्माते वुडी ॲलन आणि ट्रम्प यांचे माजी रणनीतीकार स्टीव्ह बॅनन यांचेही फोटो या संग्रहात आहेत.
धक्कादायक चॅट आणि ‘लोलिता’ संदर्भ या फोटोंमध्ये कोणत्याही बेकायदेशीर कृत्याचे थेट चित्रण नसले तरी, एक धक्कादायक ‘स्क्रीनशॉट’ समोर आला आहे. यामध्ये दोन व्यक्तींमधील संभाषणात तरुण मुलींच्या भरतीबाबत चर्चा होताना दिसत आहे. ‘माझ्या मैत्रिणीने आज काही मुली पाठवल्या आहेत, पण ती एका मुलीचे १००० डॉलर्स मागत आहे. कदाचित यातील कोणी ‘J’ (जेफ्री) साठी योग्य असेल का?’ असे त्या चॅटमध्ये म्हटले आहे. एका मुलीचे वय १८ वर्षे असल्याचेही त्यात नमूद आहे.
इतर एका छायाचित्रात एका महिलेच्या पायावर ‘लोलिता’ या कादंबरीतील ओळी हाताने लिहिलेल्या दिसत आहेत. ही कादंबरी एका प्रौढ व्यक्तीचे लहान मुलीबद्दलचे लैंगिक आकर्षण या विषयावर आधारित आहे.
राजकीय वातावरण तापले
डेमॉक्रॅट्सचे म्हणणे आहे की, पीडितांची ओळख जपून ते पारदर्शकतेसाठी ही माहिती टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करत आहेत. दुसरीकडे, रिपब्लिकन पक्षाने डेमॉक्रॅट्सवर स्वतःचा अजेंडा रेटण्यासाठी निवडक माहिती (Cherry-picking) प्रसिद्ध करत असल्याचा आरोप केला आहे.
जेफ्री एपस्टीनचा २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूवरून अनेक कट-कारस्थानं आणि चर्चांना उधाण आले होते. आता ‘एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’नुसार न्याय विभागाने अधिकृत कागदपत्रे सार्वजनिक करणे अपेक्षित आहे.



























































