
जेजुरी शहरात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयी मिरवणुकीत उमेदवारांचे औक्षण करताना आरतीच्या ताटातील ज्योतीमुळे हवेत उधळलेल्या बनावट भंडाऱयाने अचानक पेट घेतला. यावेळी आगीच्या भडक्यात जवळपास 16 ते 17 जण भाजले असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या निकालानंतर तीर्थक्षेत्र जेजुरीत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी देवदर्शनासाठी साधारण दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाद्वार रोडवर मिरवणूक आली असता विजयी उमेदवारांचे औक्षण करतेवेळी ताटातील ज्योतीमुळे हवेत उधळलेल्या बनावट भंडाऱयाने अचानक पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. या घटनेत अनेकांना भाजल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी नागरिकांनीदेखील प्रसंगावधान राखत तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना तत्काळ जेजुरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून कोणालाही गंभीर स्वरूपाची इजा झालेली नाही. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, तर काहींनी पुढील उपचारासाठी खासगी दवाखान्याचा आसरा घेतला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
या घटनेमुळे मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा कार्यक्रमांमध्ये फटाके, भंडारा व अग्नीचा वापर करताना अधिक दक्षता घेण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे



























































