
प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आणि जगाच्या भल्यासाठी अमेरिकेतील एका ४३ वर्षीय महिलेने जिवाची जोखीम पत्करली आणि प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याची तयारी दर्शविली. नुकतेच तिच्यावर या लशीचे परीक्षण करण्यात आले. जेनेफर हॉलर असे या धाडसी महिलेचे नाव असून, त्या दोन मुलींच्या आई आहेत. जेनेफर ‘टेक’ कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे काम सध्या अमेरिकेत सुरू आहे. अमेरिकन डॉक्टरांनी खास तयार केलेल्या लशीची चाचणी केवळ मानवी शरीरावर करायची होती. त्यामुळे डॉक्टर चाचणीसाठी जोखीम पत्करू शकणाऱ्या व्यक्तींच्या शोधात होते. जेनेफर यांनी त्यासाठी तयारी दर्शविली.
कोरोना प्रतिबंधासाठी वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूटसह जगभरातील प्रयोगशाळांमध्ये लशीचे संशोधन सुरू आहे. दरम्यान, जेनेफर यांचे फोटो सध्या जगभरातील समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. आपले प्राण पणाला लावणाऱ्या या महिलेच्या धाडसाला अनेकांनी सलाम केला आहे. जेनेफर परीक्षणासाठी तयार झाल्यानंतर सोमवारपासून त्यांना प्रयोगशाळेत बोलाविण्यात आले. त्यानंतर त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली.
– राष्ट्रीय स्वास्थ्य संस्थेने (एनआयएच) हे परीक्षण सुरू केले आहे. त्यासाठी ‘एनआयएच’ने निधी उपलब्ध करून दिला आहे. सिएटल येथील ‘कॅन्सर पर्मनंट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये कोरोना लशीवरचे परीक्षण सुरू आहे.
– जेनेफर यांच्यावर लशीचे परीक्षण करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर २४ तास बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या शरीरातील प्रत्येक सूक्ष्म बदल टिपण्यात येत आहेत. सर्व नोंदी करण्यात येत आहेत.
कोट
संपूर्ण जग सध्या असहाय भासत आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी कोणाकडेही सध्या कोणताही उपाय नाही. काही लोक तर आपल्या आप्तेष्टांच्या पार्थिवाला खांदाही देऊ शकले नाहीत. जग सध्या भीषण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे मी माझा जीव धोक्यात घालून ही लस टोचून घेण्याचा निर्णय घेतला. जगासाठी काहीतरी करण्याची हीच खरी वेळ आहे. माझ्या दोन्ही मुलींना ही चाचणी करून घेण्यात काही गैर वाटले नाही. कुटुंबाने यासाठी मला पाठिंबा दिला आहे.’
– जेनेफर हॉलर

























































