
सामना प्रतिनिधी । मुंबई
आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जेट एअरवेजसमोर उभे राहिलेले वैमानिकांच्या संपाचे संकट तूर्तास टळले आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी एअरलाइन्स कंपनी व्यवस्थापन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)मध्ये उद्या सोमवारी चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जेट एअरलाइन्सला आणखी एक संधी देण्याच्या हेतूने वैमानिकांना आपला सोमवारपासूनचा प्रस्तावित संप मागे घेतला आहे.
जेट एअरवेज आर्थिक अडचणीत आल्याने जानेवारीपासून त्यांच्या वैमानिकांचा पगार थकला आहे. त्याच्या निषेधार्थ नॅशनल एव्हिएटर्स गिल्डशी संबंधित असलेल्या जेट एअरवेजच्या 1100 वैमानिकांनी सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून उड्डाणे थांबवण्याचा इशारा दिला होता, मात्र एअरलाइन्सचे व्यवस्थापन आणि एसबीआयमध्ये होणाऱया चर्चेतून काहीतरी चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त करत संप मागे घेतला आहे.

























































