
सामना प्रतिनिधी। हिंगोली
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर येथील संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेत बनावट सोने गहाण ठेवून तब्बल चार कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार २९ डिसेंबर २०१५ रोजी उघडकीस आला होता. त्यानंतर चोवीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील बनावट सोने खरे असल्याचे नोंदविणारा सोनार फरार होता. या सोनाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने संभाजीनगर येथून अटक केली आहे.
संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या आखाडा बाळापूर येथील शाखेत बनावट सोने तारण ठेवून चार कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक ओमप्रकाश कनीराम पवार, वरिष्ठ लिपिक महावीर संघवई, सोने-चांदी अधिकृतपणे मूल्यांकन करून देणारे सोनार रामनिवास वर्मा यांच्यासह २४ जणांविरोधात बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एम. डी. थोरात यांनी तपास करून १९ आरोपींना अटक करीत दोषारोपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील पाच आरोपी फरार होते. यापैकी बँकेचे अधिकृत मूल्यांकन करणारे सोनार रामनिवास वर्मा हे महत्त्वाचे आरोपी होते. पोलीस निरीक्षक जगदीश भंडार वार यांनी आपल्या पथकासह तपास करीत रामनिवास वर्मा यांना संभाजीनगर येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. या अटकेमुळे या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे सापडण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.























































