
सामना ऑनलाईन । रांची
झारखंडमधील सेरायकेला खासावन जिल्ह्यात एका माथेफिरूने शिक्षिकेचा शाळेच्या आवारातच शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षिकेचा शिरच्छेद केल्यानंतर तो तिचे शिर घेऊन तो गावात सैरावैरा पळत सुटला होता. त्यानंतर तो जवळपास पाच किमी धावत गेला व जंगलात लपून बसला होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना जवळपास दोन तास अथक प्रयत्न करावे लागले. त्याने शिक्षिकेची हत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुक्रू हेस्सा या खारपरसाई माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या. मंगळवारी दुपारी मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जात होते. त्यावेळी हेस्सा तिथे उपस्थित होत्या. त्याचवेळी हरि हेमब्रोम हा माथेफिरू शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आला. त्याने हेस्सा यांना प्रवेशद्वाराजवळ बोलावले. हेस्सा या तेथे आल्या हरिने त्यांच्या मानेवर जोरात सुऱ्याने वार केला. त्याचा हा वार इतका शक्तीशाली होता की हेस्सा यांचे शिर जमिनीवर पडले. त्यानंतर हरिने ते शिर उचलले व तो त्या परिसरात सैरावैरा पळू लागला.
शाळेच्या प्रशासनााने याविषयी पोलिसांना कळविले, त्यानंतर पोलिसांनी हरिला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते पोलिसांना गुंगारा देऊन जंगलात पळून गेला. त्यानंतर जवळपास दोन तास हरिचा पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस सध्या हरिची चौकशी करत असून त्याने हेस्सा यांची हत्या का केली याचा शोध घेत आहेत. हरिच्या चौकशीच्या वेळी पोलिसांना तो मनोरुग्ण असल्याची शक्यता देखील वाटत आहे.





























































