
झिम्मा या गाजलेल्या चित्रपटाच्या मालिकेतील तिसऱ्या भागाचे पोस्टर नुकतेच दिग्दर्शक हेमंत ढोमेने प्रसिद्ध केले आहे. हेमंतने त्याच्या वाढदिवशी हे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमधून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर करण्यात आली असून तो पुढच्या वर्षी 1 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरसोबतच ‘तिसराच आहे!’ अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे नक्की या सिझनमध्ये काय असणार आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे.
झिम्मा -3 च्या पोस्टरमध्ये सिद्धार्थ चांदेकर समुद्रकिनाऱ्यावर उभा असून तो गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला भरपूर बॅग्स, सुटकेसेस, क्रिकेट बॅट आणि सूर्यफूल… त्यामुळे ही सहल आहे की काहीतरी अनपेक्षित ट्विस्ट? आणि यावेळी ‘तिसराच आहे!’ या ओळीत नेमकं काय लपलंय? असे प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत.
‘झिम्मा ३’चं दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं असून निर्मिती क्षिती जोग यांनी केली आहे. झिम्माच्या आतापर्यंतच्या दोन सिझनमध्ये सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत होता.


























































