राणीबाग ‘मिशन बिगिन अगेन’साठी सज्ज, सरकारच्या निर्णयाची प्रतिक्षा

‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू होण्यासाठी सज्ज झाले आहे. यासाठी ५० टक्के पर्यटक, सोशल डिस्टंसिंग आणि आवश्यक खबरदारीच्या नियोजनाचा आराखडा तयार ठेवण्यात आला असून आता केवळ सरकारच्या निर्णयाची प्रतिक्षा असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

केवळ मुंबईकरच नव्हे तर देशी-परदेशी पर्यटकांसाठी पालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान पहिली पसंती ठरते. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येत असतात. मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून राणी बाग बंद आहे. मात्र ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत उद्यान सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकाने दिलेल्या गाइडलाइननुसार आराखडा तयार ठेवण्यात आला आहे अशी माहिती उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. गर्दी टाळण्यासाठी सरकारची परवानगी मिळाल्यानंतर ५० टक्के पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जातील. प्राण्यांपासूनही अंतर ठेवण्यासाठी व्हिविंग गॅलरीपासून आणखी एक मीटर अंतर ठेवले जाईल. तिकीट खिडकीजवळही सुरक्षित अंतर ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. दर दोन तासांनी सॅनिटायझेशन केले जाईल. सध्या राणी बागेत प्राण्यांसंबंधी काम करणारे ३५ डॉक्टर्स-कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जातील, असेही त्रिपाठी म्हणाले.

दिवसाला दीड लाखाचा महसूल बुडतोय
– राणीच्या बागेत मार्च २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यापासून येणार्‍या पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली आहे. दररोज सुमारे पाच हजार तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी दहा ते पंधरा हजारांपर्यंत पर्यटक येत आहेत. याआधी दररोज १५ ते २० हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न एक लाखांपासून सहा लाखांपर्यंत वाढले आहे.
– यामध्ये सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख आणि महिना सरासरी ४५ लाखांवर उत्पन्न गेले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राणीबाग पर्यटकांसाठी बंद असल्याने प्रतिदिवस दीड लाखांचा महसूल बुडत आहे. मात्र राणी बाग सुरू झाल्यास पालिकेला महसूल मिळण्यास सुुरुवात होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या