
जिंतूर तालुक्यातील पांगरी गावा जवळील येसेगाव शेतशिवारात लिंबाच्या झाडाला दोरी लावून संजय तुकाराम घोळवे या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जिंतूर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय तुकाराम घोळवे यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी पागरी शिवारातील विहिरीत बुडून मृत्यू पावला होता. मुलाच्या मृत्युचा जबरदस्त मानसिक धक्का संजय यांना बसला होता. त्यातून ते नैराश्य़ात गेले होते. दि.3 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास यसेगाव येथील शेतातील एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून संजय घोळवे यांनी आत्महत्या केली.
ग्रामस्थांनी सदर माहिती पोलीसांना देताच जिंतूर पोलिस ठाण्याचे बिट जमादार धनजय गायकवाड व त्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी शवविच्छेदन केले. बीट जमादार धनंजय गायकवाड पुढील तपास करत आहेत.



























































