आईचं काळीज ते आईचंच! नागावरून उडी मारत पोटच्या गोळ्याचे प्राण वाचवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Coloured with AI

जिंतूर येथील येलदरी वसाहतीमध्ये ‘आईचं काळीज ते आईचंच!’ याची प्रचिती देणारी एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या दिशेने येणारा काळ पाहून, एका माऊलीने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता थेट फणा काढलेल्या नागाच्या अंगावरून उडी मारली आणि आपल्या लेकीला मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले.

येलदरी वसाहतीमधील रहिवासी मोनाली रवि जाधव या शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास घराच्या मागच्या बाजूला आपली दोन वर्षांची मुलगी रेणुका हिला शौचास बसवण्यासाठी गेल्या होत्या. त्याच वेळी दबा धरून बसलेला एक मोठा जहाल विषारी नाग अचानक रेणुकाच्या अगदी पायापाशी आला. समोर साक्षात काळ उभा असल्याचे पाहून कोणत्याही सामान्य व्यक्तीची गाळण उडाली असती. मात्र, मोनाली जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘रुद्र’ अवतार धारण केला. मुलीच्या अंगावर नाग झडप घालणार इतक्यात, मोनाली यांनी चक्क त्या नागाच्या अंगावरून उडी घेतली आणि रेणुकाला अलगत आपल्या कवेत ओढले. आईच्या या साहसामुळे चिमुकल्या रेणुकाचे प्राण थोडक्यात वाचले. आईने केलेल्या धाडसामुळे हे शक्य झाले असल्यामुळे अनेकांनी या कार्याचे कौतुक केले.

मोनालीच्या धाडसाचे कौतुक

‘लेकरावर संकट आल्यावर आई वाघीण होते, हेच आज या माऊलीने सिद्ध करून दाखवले,’ अशी भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. सध्या संपूर्ण जिंतूर तालुक्यात मोनाली जाधव यांच्या या अचाट धैर्याचे कौतुक होत असून, सोशल मीडियावरही या ‘धाडसी आई वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वन विभागाची वेळीच मदत

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शेजारी राहणारे प्रवीण मुळी यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे अधिकारी व्ही.बी. चाटसे आणि सर्पमित्र प्रमोद भालेराव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या शिताफीने त्या नागाला पकडले आणि सुरक्षितरीत्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) मुक्त केले.