
कटकारस्थान करत महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील आमदारांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरू असल्याचं चित्र आहे. कारण, कॅबिनेट मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी महिलांवर विधान करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघाचे आमदार आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये त्यांच्याकडे आदिवासी विकास खाते देण्याते आले. धुळे जिल्ह्यातील अंतुर्ली येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी दररोज मासे झाल्ल्यामुळे ऐश्वर्या राय हिचे डोळे सुंदर झाल्याचं म्हटलं. यावेळी मासे खाण्याचे फायदे आणि त्याच्या तेलाचे फायदेही सांगितले.
गावित यांच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, मी आजपासून मासे खायला सुरुवात करतोय. आज सकाळीच मासे खाऊन घराबाहेर पडलो आहे. गावितांनी नवीन शोध लावलाय. डॉक्टर आहेत ना ते त्यामुळेच… कदाचित त्यांना औषधोपचार माहिती असतील. त्यात व्हिटॅमिन डी वगैरी काहीतरी असतं, त्यात कसलंतरी ऑईल असतं, मासे प्रोटिन्सने भरलेले असतात वगैरे काहीतरी माहिती असेल त्यांना, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, विजयकुमार गावितांनी आता अभ्यास वर्ग घ्यायला हवेत. त्यांच्याकडे चांगले भरपूर विद्यार्थी येतील. पोरी कशा पटवाव्यात असा त्यांचा सल्ला आहे. मंत्री चांगले सल्ले देत आहेत. राज्यासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांशी, अडचणींशी या सरकारचं काही देणंघेणं नाही. ते आता मंत्री झाले आहेत. याच्यातच ते इतके भयंकर खूश आहेत की त्यांना महाराष्ट्राशी काही देणंघेणं राहिलेलं नाही. आग लगे बस्ती में, मस्तराम मस्ती में, अशी स्थिती आहे. हे सगळे मस्तराम आहेत. महाराष्ट्र जळतोय, जळू द्या, असंच सुरू आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

























































