
मुंबईतल्या म्हाडाच्या 56 वसाहतीमधील वाढीव सेवाशुल्कावर सूट देण्याबाबतचा अभय योजनेबाबतचा प्रस्ताव म्हाडाकडून राज्य सरकारला सादर झाला असून त्यावर राज्य सरकार पुढील कार्यवाही करीत आहे, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत दिली.
मुंबईतील म्हाडाच्या 56 वसाहतींमधील रहिवाशांकडून मागील वीस वर्षांचे थकीत वाढीव सेवा शुल्क भरण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या वाढीव शुल्कात सूट मिळावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. याबाबत शिवसेनेचे मंगेश कुडाळकर यांनी मूळ प्रश्न विचारला होता. रमेश कोरगावकर, अजय चौधरी आणि वैभव नाईक यांनीही यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या वसाहतींमधील थकीत सेवा शुल्काच्या संदर्भात तत्कालीन गृहनिर्माणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींवर राज्य सरकारने कोणता निर्णय घेतला, असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला.
त्यावर तत्कालीन गृहनिर्माणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशींचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी लेखी उत्तरात दिली. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत म्हाडा वसाहतीच्या थकीत सेवा शुल्काच्या प्रलंबित प्रश्नावर उपाययोजना सुचवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार अभय योजना तयार करून त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार म्हाडाकडून सरकारला अहवाल सादर झाल्याचे उत्तरात नमूद केले आहे.
तब्बल 30 वर्षे रखडलेला प्रश्न सुटणार! माहीममधील तीन इमारतींचा पुनर्विकास म्हाडा करणार
माहीममधील मोहम्मदी इमारत, गुलाम रसूल चाळ आणि कांदेवाला चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाने ताब्यात घेतल्या आहेत, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत दिली.
या तीन इमारतींसह माहीमधील कांदेवाला चाळीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 30 वर्षे होऊनही या इमारतींचा पुनर्विकास झाला नसल्याने या इमारती धोकादायक झाल्याबद्दल सरवणकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
त्यावर पटेल इमारतीचे, तसेच मोहम्मदी इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. गुलाम रसूल चाळ पूर्णपणे रिकामी करून पाडण्यात आली . बोरी चाळ व कांदेवाला चाळ या दोन्ही चाळी पाडण्यात आल्या आहेत, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी लेखी उत्तरात दिली.





























































