
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या संदर्भात निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आयोगाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल केव्हाही येणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत सुनील तटकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल असे वक्तव्य करणे म्हणजे निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासारखे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावा अजित पवार यांच्या सोबत असणाऱयांकडून करण्यात येत होता. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आम्ही केव्हाही अशा प्रकारे दावा केला नाही. निवडणूक आयोग एक स्वायत्त विभाग आहे. निवडणूक आयोगाने युक्तिवाद सुरू असताना दोन्हीही पक्षांना निवडणूक चिन्हाबाबत असे भाष्य करू नये,असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे याचिकेवर लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. तरीदेखील अजित पवार यांच्यासोबत असलेल्यांकडून पक्ष आणि चिन्हाबाबत वक्तव्य करण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल आव्हाड यांनी केला. तसेच आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक अजित पवार समर्थक आमदार व शिंदे गटातील आमदार आणि खासदार स्वतःहून भाजपच्या तिकिटावर लढण्यास तयार होतील, अशी परिस्थिती असल्याचा दावा आव्हाड यांनी केला.























































