
ईडीच्या नावाने दलाली करणाऱया जितेंद्र नवलानी याचा कोटय़वधी रुपये वसुलीचा गैरकारभार चव्हाटय़ावर आला आहे. नवलानी याने ईडी अधिकाऱयांच्या नावाने विविध खासगी कंपन्यांकडून 58 कोटी 96 लाख 46 हजार रुपये उकळले आणि स्वतःच्या कंपन्यांच्या माध्यमातून ती रोकड ‘व्हाईट’ केल्याचे ऑण्टिकरप्शन ब्युरोच्या तपासात निष्पन्न झाल्याने जितेंद्र नवलानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवलानीच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 8 व कलम 7 अन्वये गुन्हा दाखल झाला असून नवलानीच्या भ्रष्टाचाराबाबत काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
नवलानीचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट
ऑण्टिकरप्शन ब्युरोने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये जितेंद्र नवलानी व अन्य यांनी विविध खासगी कंपन्यांकडून ईडी अधिकाऱयांच्या नावाने सन 2015 ते 2021 या कालावधीमध्ये 58 कोटी 96 लाख 46 हजार रुपये उकळले. तसेच सदरच्या रकमा त्याने स्वतःच्या तसेच त्याची मालकी व नियंत्रणाखाली असलेल्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून ‘अनसिक्युअर्ड लोन व कन्सल्टन्सी फी’च्या स्वरूपात ‘व्हाईट’ करून घेतल्या.





























































