कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, एके-47 सह 3 दहशतवाद्यांना अटक

489

जम्मू-कश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला असून एके 47 सह जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पंजाब-जम्मू-कश्मीर सीमेवरील लखनपूर येथून या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा घेऊन जाणारा ट्रकही जप्त केला .

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने व पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहिम सुरू केली. यावेळी कठुआ येथे एक संशयित ट्रक पोलिसांच्या नजरेस पडला. त्यातील तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यांच्याजवळून 6 एके 47 जप्त करण्यात आल्या. हा ट्रक पंजाबहून कश्मीरला जात होता.

तसेच ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही सापडला. दरम्यान कठुआच्या पोलीस अधिक्षकांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच दोन दिवसात सुरक्षा दलाला मिळालेले हे दुसरे यश असल्याचेही ते म्हणाले आहेत.

याआधी बुधवारी सुरक्षा दलाने लश्कर ए तोयबाचा दहशतवादी आसिफ याचा खात्मा केला आहे. आसिफने सोपोर येथे एका फळ विक्रेत्याच्या घरावर गोळीबार करत तीनजणांना जखमी केले होते. ज्यात एका 30 महिन्याच्या चिमुरडीचाही समावेश आहे. आसिफ तेथील सफरचंद व्यापाऱ्यांना व्यापार बंद करण्याच्या वारंवार धमक्या देत होता. गेल्या महिन्याभरापासून तो सक्रिय झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या