
जेएनपीएमध्ये वर्षाला सुमारे ५० लाख कंटेनर हाताळण्याची क्षमता असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये (बीएमसीटी) लोच्या झाला आहे. त्यामुळे या बंदाराच्या कामकाजाची घडी पुरती विस्कटल्याने त्याचा फटका हजारो आयात-निर्यातदार व्यापाऱ्यांना बसला आहे. ट्रेलर्सना प्रवेश करण्यासाठी या बंदरात ४० गेट तयार करण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी फक्त चारच गेट खुले ठेवण्यात आल्याने मोठ्या संख्येने कंटेनर्सची रखडपट्टी झाली आहे. बीएमसीटीचा आर्थिक डोलारा कोसळल्यामुळे आयात-निर्यातदार धास्तावले आहेत.
जेएनपीएने सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चुन बीएमसीटी हे बंदर विकसित केले आहे. हे अत्याधुनिक बंदर वर्षभरापूर्वीच कार्यान्वित झाले आहे. यामुळे जेएनपीए बंदराची कंटेनर हाताळणीची वार्षिक क्षमता एक कोटीहून अधिक वाढली आहे. मात्र मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती दरम्यान बंदराच्या कामकाजाची व कंटेनर मालाची आयात-निर्यातीची घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. ही घडी पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र आता बंदराचा आर्थिक डोलारा कोसळल्यामुळे ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली आहे. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांचे सदस्य, आयात-निर्यातदार, व्यापारी संस्था आणि हितधारकांनी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई कस्टम ब्रोकर असोसिएशनचे (बीसीबीए) सचिव नीरव ठक्कर यांनी केले आहे.






















































