
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आज रविवारी मास्क लावलेल्या हल्लेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात घोष यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. दरम्यान, हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केल्या आरोप जेएनयूने केला आहे.
या घटनेत 15 विद्यार्थी आणि प्राध्यापक जखमी झाले आहेत. जखमींना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. पोलीस गस्त घालत असतानाही एबीवीपीचे समर्थक काठय़ा आणि रॉड घेऊन फिरत होते. त्यांचे चेहरे झाकलेले होते. त्यांच्याकडून दगडफेक झाली तसेच भिंतीवर चढून त्यांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांना मारहाण केली, अनेक शिक्षकांवरही त्यांनी हल्ला चढवला, तसेच वाहनांचीही तोडफोड केली, असा आरोप जेएनयूच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


























































