जो रूट कर्णधार पदावरून पायउतार, ऍशेस मालिकेतील पराभव मनाला लागल्याची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंड क्रिकेट संघाच्या फलंदाजीचा कणा समजला जाणारा कर्णधार जो रूट याने इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रूटने कर्णधारपद सोडल्यामुळे संघाचे कर्णधारपद द्यायचे कोणाकडे? असा प्रश्न इंग्लंड क्रिकेट बोर्डापुढे निर्माण झाला आहे. ऍशेस मालिकेतील पराभव आणि त्यानंतरच्या कसोटी मालिकेतील इंग्लंडचा पराभव मनाला लागल्याने रूटने संघ नेतृत्व सोडल्याची चर्चा आहे.

इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटची कमान सांभाळण्यासाठी अनेक जणांची नावे घेण्यात येत आहे, मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. मात्र जो रूटने कर्णधारपद सोडल्यानंतर आता केवळ केन विल्यमसन हा एकमेव फॅब फोर खेळाडू आहे जो राष्ट्रीय संघाचा कर्णधार राहिला आहे.

जो रूटने कर्णधारपद सोडल्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार होण्याचे अनेक दावेदार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्ड कसोटी संघाचा नियमित भाग असलेल्या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा सोपवू इच्छित आहे.

बेन स्टोक्स जो रूटचा उत्तराधिकारी 

   इंग्लंडसाठी 27 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम करणाऱया जो रूटने कर्णधारपद सोडल्यानंतर सर्व प्रथम बेन स्टोक्सचे नाव आघाडीवर आहे. त्याच्याशिवाय जॉस बटलरच्या नावाचादेखील विचार केला जाऊ शकतो. फलंदाज म्हणून जो रूटची कामगिरी चांगली झाली आहे, पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाला नुकत्याच झालेल्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी इंग्लंडने ऍशेस मालिकादेखील गमावली आहे. हेच त्याचे पद सोडण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. इंग्लंडने गेल्या 18 पैकी 11 कसोटी सामन्यांत पराभव पत्करला आहेत.

रूटची कर्णधारपदाची कारकीर्द

रूटने 64 कसोटी सामन्यांत कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्यातील 27 कसोटी सामने जिंकले आहेत, तर 26 सामने गमावले आहेत. 11 कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत. कर्णधार म्हणून फलंदाजीत रूटची बॅट तळपली आहे. त्याने 64 कसोटींत 5 हजार 295 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 46 राहिली आहे. या 64 सामन्यांत त्याने 14 शतके झळकावली आहेत.