
हिंदुस्थानात एकदा सरकारी नोकरी लागली की, सेवानिवृत्त होऊनच ती व्यक्ती बाहेर पडते. त्यामुळे सरकारी नोकरी म्हणजे कायमस्वरूपी सुरक्षित नोकरीची हमी ही मानसिकता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकच गडद झाली आहे. कोरोनामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱया शेकडोंच्या नोकऱया गेल्या, शेकडोंच्या पगारात कपात झाली, अशा वेळी खासगी नोकरी नको, सरकारीच हवी, असे म्हणणाऱया तरुणांची संख्या वाढली आहे. ‘अड्डा247’ या शिक्षण मंचाने केलेल्या सर्वेक्षणात लोकांचा कल समोर आला आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका देशातील खासगी क्षेत्रातील नोकरदारांना बसला आहे. शेकडो जणांना नोकऱया गमवाव्या लागल्या आहेत तर शेकडोंच्या पगारात कपात करण्यात आली. परिस्थितीत अजूनही विशेष सुधारणा न झाल्यामुळे असंख्य कर्मचाऱयांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. परिणामी नोकरीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारी नोकरीच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. या सर्वेक्षणात सहभागी सुमारे 6500 नोकरी इच्छुक उमेदवारांपैकी 82.33 टक्के तरुणांनी खासगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी करण्याला प्राधान्य देऊ, असे म्हटले आहे.























































