
जोगेश्वरी रेल्वे फाटकाजवळ जोगेश्वरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले असून विद्युत पुरवठा जोडणी पूर्ण झाल्यावर पूर्वेकडील सरकते जिने नागरिकांसाठी प्राधान्याने सुरू करण्यात येतील, असे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.
या पुलाच्या कामाबाबत शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर या पुलाच्या कामाच्या प्रगतीबाबत एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात सविस्तर माहिती दिली. महापालिकेच्या वतीने 2016 रोजी काम सुरू करण्यात आले. सरकता जिना वगळून पूर्वेकडील पुलाचे काम जानेवारी 2020 मध्ये तर पश्चिमेकडील काम मे 2021 रोजी पूर्ण झाले. मात्र या बाजूकडील सरकत्या जिन्यांचे काम सुरू झालेले नाही. पूर्वेकडील बाजूला सरकता जिना बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
इलेक्ट्रिक मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र जोगेश्वरी स्थानकाच्या पूर्वेच्या बाजूला रेल्वेमार्फत बसवलेला सरकता जिना सुरू झाला असून लहान मुले, वयोवृद्ध, अपंग व्यक्ती या जिन्याचा वापर करीत आहेत. पादचारी पुलाच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या भूमिगत सेवा, अरुंद रस्ता तसेच कोरोनामुळे लावलेला लॉकडाऊन, बांधकाम स्थलांतरित करण्याचे कामे, सार्वजनिक शौचालय तोडण्याचे काम या कारणांमुळे पूर्वेकडील बाजूची कामे पूर्ण करण्यास विलंब झाल्याची माहितीही सभागृहात देण्यात आली.






















































