जोगेश्वरी टर्मिनससाठी अर्थसंकल्पात तरतूद, 2023 साली प्रकल्प पूर्ण होणार

911

मुंबई शहराची लाइफ लाइन लोकलचा प्रवास निर्धोकपणे होण्यासाठी लांबपल्ल्याच्या गाडय़ांना आता शहरात न आणता उपनगरातच त्यांचा प्रवास संपविण्याचे धोरण ठरले जात आहे. याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी रेल्वे बजेटमध्ये पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकात नवे टर्मिनस बांधण्यासाठी 50 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. यंदाच्या बजेटमध्ये पुन्हा एक कोटी रुपये या टर्मिनससाठी मिळाले आहेत. त्यामुळे जोगेश्वरी टर्मिनसचे काम निविदा काढण्यात येऊन सुरू होणार असले तरी टर्मिनस पूर्ण होण्यासाठी 2023 उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी येथे लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी टर्मिनस उभारण्याची योजना आहे. मुंबई उपनगरीय गाडय़ांना लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा व्यत्यय येत असल्याने बाहेरगावी जाणार्‍या मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी शहराच्या बाहेरच टर्मिनस बांधण्याची योजना राबविली जात आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल कोचिंग टर्मिनसबरोबर आता पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी येथेही टर्मिनस बांधण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी 69 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

जोगेश्वरीत लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी दोन प्लॅटफॉर्म बांधण्यात येत आहेत. त्यावरून मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना सोडण्याचे नियोजन आहे. तसेच काही गाडय़ांचा प्रवास येथेच संपविण्यात येणार आहे. मेल-एक्स्प्रेस गाडय़ा नसतील तेव्हा लोकल गाडय़ांसाठीही प्लॅटफॉर्म वापरता येणार आहेत. प्रथम प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाईल. प्लॅटफॉर्म बांधण्याच्या कामासाठी अडीच कोटी खर्च येणार आहे तर उर्वरित बजेटमधून रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यासह अन्य तांत्रिक कामे केली जाणार आहेत. हा प्रकल्प मार्च 2023 च्या आधी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या