
रायगड जिह्यातील ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ‘रायगडभूषण’ पुरस्काराने गौरवलेले ज्येष्ठ पत्रकार नवीनचंद्र सोष्टे यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्यांचे वय 69 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
नवीनचंद्र सोष्टे यांची महिन्याभरापासून कोरोनाशी झुंज सुरू होती. अलिबाग येथील सिव्हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या 45 वर्षांपासून सोष्टे यांनी पत्रकारिता केली. अभ्यासपूर्ण बातमीदारी करतानाच त्यांनी रायगड जिह्यातील प्रदूषणकारी कारखानदारीविरोधात सातत्याने आवाज उठवला. बिहार प्रेस बिलविरेधात आंदोलन करत त्यांनी 1982 मध्ये तुरुंगवास भोगला होता. नागोठणे पत्रकार संघाचे ते ज्येष्ठ सल्लागार होते.
सोष्टे यांनी लिहिलेली 21 पुस्तके प्रसिद्ध आहेत. 1989 च्या अंबानदी महापुरावरील त्यांचे ‘अंबाकाठचे अश्रू’ हे पुस्तक वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने त्यांच्या अभ्यासिकेत संदर्भग्रंथ म्हणून ठेवले आहे. विविध सामाजिक संघटनांशी जोडले गेलेले सोष्टे यांनी गरीब, वंचित आणि उपेक्षितांचा आवाज बनून लोकांना न्याय मिळवून दिला. नव्या पिढीतील अनेक पत्रकार त्यांनी घडवले. त्यांच्या निधनाने रायगड जिह्याच्या पत्रकारिता, साहित्यिक क्षेत्रातील मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.





























































