
रायगड जिह्यातील विविध प्रश्नांची जाण असणारे अभ्यासू पत्रकार व माजी नगरसेवक संतोष पवार यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. उपचारासाठी तातडीने नेरूळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात नेत असताना मध्येच ऑक्सिजन संपल्याने त्याची प्राणज्योत मालवली. ते 54 वर्षांचे होते. पवार यांच्या निधनामुळे रायगडातील पत्रकारांमध्ये तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.
संतोष पवार यांना पहाटे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून डी. वाय. पाटील रुग्णालयात नेण्याचे ठरले. चौकाजवळ येताच त्यांना लावलेला ऑक्सिजन संपला. नर्सने ड्रायव्हरच्या मदतीने दुसरा ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा स्फोट झाला. दरम्यान, 15 मिनिटे पवार यांना ऑक्सिजन मिळाला नाही. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.






























































