केंद्र सरकारची उदासीनता ठाणेकरांचा जीवघेणा प्रवास संपता संपेना; नवीन ठाणे स्टेशन रेल्वे मंत्रालयाने लटकवले

नवीन ठाणे स्टेशन रेल्वे मंत्रालयाने लटकवले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेले ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरीत काम मार्गी लावण्यासाठी पालिकेने ७ वेळा पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासनाकडून एका ओळीचे उत्तर आलेले नाही. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या या उदासीनतेमुळे ठाणेकरांचा जीवघेणा प्रवास संपेना अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन ठाणे स्थानक विकसित करण्यात येत आहे. महापालिकेच्या अखत्यारीत असलेले काम जवळपास पूर्ण होत आहे. मात्र रेल्वेच्या अखत्यारीत येत असलेल्या कामाला मात्र एवढ्या वर्षात अद्याप सुरुवातदेखील झालेली नाही. पालिकेने मार्च २०२६ला त्यांच्या अखत्यारीत असलेले काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु रेल्वेकडून अद्याप कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने रेल्वे स्थानक नेमके कधी सुरू होणार याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानकाची डेडलाईन हुकली ठाणे रेल्वे स्थानकामधून दररोज सात ते आठ लाख प्रवाशी प्रवास करत असून संध्याकाळी तर लोकल पकडण्यासाठी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी पकडावी लागते. त्यामुळे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचे काम २०१८ रोजी सुरू करण्यात आले. मात्र न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे या कामाला गती मिळू शकली नाही. सुरुवातीला नवीन स्थानकाचे काम डिसेंबर २०२४पर्यंत पूर्ण होईल असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र आता ही डेडलाईनदेखील हुकली आहे.

प्रकल्पाचे फायदे
नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या त्या प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत.
कर्जत, कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत.
ठाणे स्थानकातील सुमारे ३१ टक्के, मुलुंड स्थानकातील २१ टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पात ३.७७ एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून १० एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३२७ कोटींचा असून यामध्ये ठाणे महापालिका १४३ कोटी तर रेल्वेकडून १८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
२०१८ साली या प्रकल्पाचा खर्च हा २६३ कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र आता यामध्ये ६४ कोटींची वाढ झाली असून हा खर्च ३२७ कोटींवर गेला आहे. स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, डेक आणि पार्किंगची सुविधा अशी कामे पालिकेने केली आहेत.
रेल्वेकडून स्थानकातील प्लॅटफॉर्म, रेल्वेची इमारत आणि इतर अत्यावश्यक गोष्टी बांधणार आहे. मात्र या कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. या विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम आता रेल्वे मंत्रालयामुळे रखडले असल्याचे समोर आले आहे.